AFG vs ENG : इब्राहीम झाद्रानची CT स्पर्धेतील सर्वोच्च खेळी, इंग्लंडसमोर 326 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Afghanistan vs England 1st Innings Highlights : अफगाणिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्यात 325 धावांचा डोंगर उभा केला आहे.

AFG vs ENG : इब्राहीम झाद्रानची CT स्पर्धेतील सर्वोच्च खेळी, इंग्लंडसमोर 326 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Ibrahim Zadran AFG vs ENG
| Updated on: Feb 26, 2025 | 7:14 PM

अफगाणिस्तानचा स्फोटक सलामीवीर इब्राहीम झाद्रान याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत केलेल्या सर्वोच्च वैयक्तिक धावा केल्या. इब्राहीम झाद्रान याने केलेल्या 177 धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने इंग्लंडला ‘करो या मरो’ सामन्यात 326 धावांचं आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 325 धावा केल्या. इंग्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांची या स्पर्धेत पराभवाने सुरुवात झालीय. त्यामुळे आता दोन्ही संघांना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी जिंकणं गरजेचंच आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान 325 धावांचा यशस्वी बचाव करते की इंग्लंड विजय मिळवून स्पर्धेत स्वत:चं आव्हान कायम राखण्यात यशस्वी ठरते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कर्णधार हशमतुल्ला शाहिदी याचा हा निर्णय सुरुवातीला चुकल्याचंच वाटत होतं. अफगाणिस्तानने झटपट 3 विकेट्स गमावले. रहमानउल्ला गुरबाज, सेदीकुल्लाह अटल आणि रहमत शाह या तिघांनी अनुक्रमे 6,4,4 अशा धावा केल्या. मात्र त्यानंतर इब्राहीमने मधल्या फळीतील फलंदाजांसह निर्णायक भागीदारी करत अफगाणिस्तानला 300 पार पोहचवलं.

इब्राहीमने 146 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 12 फोरसह 177 धावा केल्या. इब्राहीम यासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने इंग्लंडच्या बेन डकेट याचा विक्रम मोडला. इब्राहीम व्यतिरिक्त कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि मोहम्मद नबी या दोघांनी प्रत्येकी 40-40 धावा केल्या. तर अझमतुल्लाह ओमरझाई याने 41 धावा जोडल्या. तसेच इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर अफगाणिस्तानने 325 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून लियाम लिविंगस्टोन याने 2 विकेट्स घेतल्या. तर जेमी ओव्हरटन आणि आदिल रशीद या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

इंग्लंडसमोर 326 धावांचं आव्हान

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद आणि मार्क वुड.

अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद आणि फजलहक फारुकी.