विराट कोहली पंगा मग झाली मैत्री, आता थेट आयपीएल स्पर्धेतून बाहेर! ‘त्या’ निर्णयामुळे नवीन उल हकचे ग्रह फिरले
आयपीएल 2023 स्पर्धा विराट कोहली आणि नवीन उल हकच्या वादामुळे चांगलीच गाजली. आयपीएल संपेपर्यत काही ना काही या दोघांच्या नावाने समोर येत होतं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत या दोघांनी वादावर पडदा टाकला. पण आता नवीन उल हकसह तीन खेळाडूंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेसाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरु झाली. आयपीएल मिनी लिलावात याचा अंदाज आला आहे. कोट्यवधी रुपयांची उधळण करून खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. पण आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी आणि नवीन उल हक यांच्यावर कारवाई केली आहे. या तिघांनी अफगाणिस्तानसाठी खेळण्याऐवजी खासगी हिताला प्राधान्य दिल्याचं समोर आलं आहे. यासाठी बोर्डाने 2024 वर्षासाठी वार्षिक करार करण्यास दिरंगाई केली आहे. तसेच पुढच्या दोन वर्षात या तिघांना एनओसी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मागच्या काळात दिलेली एनओसीदेखील रद्द केली आहे. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना आयपीएल 2024 स्पर्धा खेळणंही कठीण आहे. कारण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी देशातील क्रिकेट बोर्डाची एनओसी गरजेची आहे. तीन खेळाडूंना एनओसी मिळाली नाही तर फ्रेंचायसीला धक्का बसणार आहे. यात कोलकाता, हैदराबद आणि लखनऊचा समावेश आहे.
मुजीब उर रहमान कोलकाता नाइट रायडर्सकडून, फजलहक फारुकी सनरायजर्स हैदराबादकडून, तर नवीन उल हक लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानुसार या तिघांनी 1 जानेवारी 2024 पासून वार्षिक करारातून बाहेर राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच प्रायव्हेट लीगमधून खेळण्याची परवानगी मागितली आहे. यानंतर क्रिकेट बोर्डाने एका समितीचं गठण केलं आणि शहनिशा करण्यास सांगितलं. त्यानंतर या तीन खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानकडून हे तिन्ही खेळाडू खेळले होते. या स्पर्धेत अफगाणिस्तानची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. अफगाणिस्तानने 9 पैकी 5 सामने जिंकले होते. यात इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या दिग्गज संघांना पराभवाचं पाणी पाजलं होतं. तसेच उपांत्य फेरीच्या रेसमध्येही संघ होता. वर्ल्डकप स्पर्धेनंतर नवीन उल हकने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नुकतीच अबुधाबी येथे पार पडलेल्या टी10 लीगमध्ये खेळला होता.
मुजीब उर रहमानने 1 कसोटी, 75 वनडे आणि 43 टी20 सामने खेळले आहेत. नवीन उल हकने 15 वनडे आणि 27 टी20 सामने खेळले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका जानेवारीत होणार आहे. 11 जानेवारीला मोहालीत, 14 जानेवारील इंदुरला आणि 17 जानेवारीला बंगळुरुत आहे.
