Ajinkya Rahane: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणे टी20 लीग स्पर्धेसाठी सज्ज, संघाकडून त्याच्या नावाची घोषणा

भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे त्याचा पुढचा प्लान काय असेल? याबाबत क्रीडाप्रेमी संभ्रमात होते. मात्र आता चित्र स्पष्ट झालं असून विदेशी टी20 लीग स्पर्धा खेळणार आहे.

Ajinkya Rahane: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणे टी20 लीग स्पर्धेसाठी सज्ज, संघाकडून त्याच्या नावाची घोषणा
Ajinkya Rahane: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणे टी20 लीग स्पर्धेसाठी सज्ज, संघाकडून त्याच्या नावाची घोषणा
Image Credit source: Money 9 वरून
| Updated on: Aug 07, 2026 | 4:31 PM

भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलला नुकताच रामराम ठोकला. त्यानंतर आता विदेशी टी20 लीग स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. खरं तर निवृत्ती घेतल्यानंतर अजिंक्य रहाणे कोचिंग किंवा समालोचकाच्या भूमिकेत दिसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र त्याने आता व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन टी20 प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या पर्वात अजिंक्य रहाणे खेळणार आहे. अजिंक्य रहाणे युरोपियन टी20 प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत एम्स्टर्डम फ्लेम्स संघाकडून खेळणार आहे. मिचेल मार्शच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. या संघात स्टीव्ह स्मिथ, टिम डेविड या सारखे स्टार खेळाडू आहेत.

अजिंक्य रहाणेची म्स्टर्डम फ्लेम्स संघात मार्की प्लेयर म्हणून नियुक्ती झाली आहे. फ्रेंचायझीने शुक्रवारी अधिकृतरित्या जाहिर केलं की, मार्की प्लेयर म्हणून अजिंक्य रहाणे संघात सहभागी झाला आहे. मार्की प्लेयर म्हणजे कोणत्याही क्रीडा स्पर्धेत किंवा संघात असलेला असा खेळाडू जो त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, प्रसिद्धीमुळे आणि लोकप्रियतेमुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.या खेळाडूंना संघात घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये मोठी चढाओढ असते, त्यामुळे त्यांना सर्वाधिक किंमत मिळते. मार्की खेळाडू मैदानाबाहेरील चाहत्यांना स्टेडियमकडे आणि टीव्ही स्क्रीनकडे आकर्षित करण्यासाठी ओळखले जातात. अजिंक्य रहाणेसारखा खेळाडू या लीग स्पर्धेत खेळणार असल्याने लीगला फायदा होईल. यात भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनसह माजी दिग्गज खेळाडू खेळणार आहेत.

एम्स्टर्डम फ्लेम्सचे को फाउंडर स्टीव वॉ यांनी अजिंक्य रहाणे याचं स्वागत करत सांगितलं की, ‘रहाणेमध्ये कौशल्य, नेतृत्व, नम्रता आणि एका व्यावसायिक क्रिकेटपटूमध्ये असायला हवे असलेले सर्व गुण आहेत. त्याने केवळ आपल्या खेळासाठीच नव्हे, तर मैदानातील वागणुकीसाठीही प्रचंड आदर मिळवला आहे.’ अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी, 90 वनडे आणि 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत 5077, वनडेत 2962 आणि टी20 375 धावा केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us