Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला..

Ajinkya Rahane Quit Mumbai Captaincy : अजिंक्य रहाणे याने देशांतर्गत क्रिकेट हंगामाला सुरुवात होण्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. रहाणेने मुंबईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला..
Ajinkya Rahane Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 21, 2025 | 4:35 PM

विराट कोहली याच्या अनुपस्थितीत आणि युवा खेळाडूंच्या सोबतीने भारताला काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने मोठा निर्णय घेतला आहे. रहाणेने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रहाणेने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणाऱ्या रहाणे याने मुंबई क्रिकेट टीमच्या (Mumbai Cricket) कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. रहाणेने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची घोषणा केली आहे.

अजिंक्य रहाणेने काय म्हटलं?

“मुंबई टीमचं नेतृत्व करणं आणि चॅम्पियनशीप जिंकून देणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामासाठी नवा कर्णधार तयार करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असं मला वाटतं. त्यामुळे मी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रहाणेने या पोस्टमध्ये म्हटलंय.

“मी खेळाडू म्हणून सर्वोत्तम प्रयत्न करण्यासाठी तयार आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबत प्रवास सुरु ठेवेन, जेणेकरुन आम्ही आणखी खिताब जिंकू. या हंगामाची फार वाट पाहतोय”, असंही रहाणेने म्हटलं. रहाणेने त्याच्या नेतृत्वात मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून देत अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली होती.

7 वर्षांनंतर मुंबई चॅम्पियन

मुंबईने अजिंक्यच्या नेतृत्वात 7 वर्षांनंतर 2023-2024 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. मुंबईने घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये विदर्भाला अंतिम सामन्यात 169 धावांनी पराभूत केलं होतं. मुंबईने अशाप्रकारे 42 व्या वेळेस रणजी ट्रॉफी उंचावली होती. तसेच मुंबईने गेल्या हंगामात अर्थात 2024-2025 मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली होती. रहाणेने या दरम्यान 14 डावांत 35.92 च्या सरासरीने 467 धावा केल्या होत्या.

तसेच रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने ईराणी कपवरही नाव कोरलं होतं. इराणी कप फायनलमध्ये मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया आमनेसामने होते. मात्र मुंबईने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला होता.

दरम्यान 2025-2026 या हंगामातील रणजी ट्रॉफी स्पर्धेला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मुंबईसमोर पहिल्या सामन्यात जम्मू-काश्मीरचं आव्हान असणार आहे. रहाणेने आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 200 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. रहाणेने 201 सामन्यांमध्ये 14 हजार धावा केल्या आहेत.