त्या क्षणी मी…! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर पत्नी राधिकाची पोस्ट, आई वडिलांचं पत्र

अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. व्यावसायिक क्रिकेटही खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आता मैदानाबाहेर असणार आहे. पण त्याच्या या निर्णयानंतर कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

त्या क्षणी मी...! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर पत्नी राधिकाची पोस्ट, आई वडिलांचं पत्र
त्या क्षणी मी तिथेच उभी राहिले होते...! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 31, 2026 | 7:11 PM

शांत.. संयमी क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अजिंक्य रहाणेने एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली. हि माहिती देताना खूपच भावुक झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रुही तरळले होते. त्याच्या निवृत्तीनंतर क्रीडाविश्वातून प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या दरम्यान एक पोस्ट खास होती.. ही पोस्ट त्याची पत्नी राधिकाने केली होती. तिने सोशल मीडियावर ही पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या निवृत्तीपूर्वी काय काय घडलं? याबाबतच्या भावना तिने आपल्या शब्दात मांडल्या.  तर अजिंक्यच्या आई वडिलांनी पत्र लिहून त्याला शुभेच्छा दिल्या. राधिकाने पोस्टमध्ये लिहिलं की, ‘या आयपीएल हंगामासाठी तू एअरपोर्टकडे निघाला होतास, तेव्हा लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी तू मला म्हणालास, चलो रॉड्स, हे शेवटचं पर्व आहे. मी हे शेवटचं करून दाखवणार आहे. मला आजही आठवतंय, त्या क्षणी मी तिथेच उभी राहिले होते… काय बोलावं आणि कशी प्रतिक्रिया द्यावी हेच सूचत नव्हतं. त्या एका क्षणात असंख्य आठवणींचा पूर आला होता, तुझा संपूर्ण प्रवास माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता.’

तू नेहमी तुझ्या नावाप्रमाणे अजिंक्य राहिलास….

राधिका रहाणे हिने पुढे लिहिलं की, ‘पहाटेच्या वेळचे तुझे वर्कआउट्स आणि सराव सत्रं, सामन्यांपूर्वीची चिंता, संघातील निवडीचा ताण, सतत बॅग भरत राहणे आणि पुन्हा रिकामी करणे, तुझी शिस्त, त्याग, समर्पण… क्रिकेटपटू म्हणून तुझ्या आयुष्याची ओळख बनलेल्या या सगळ्या गोष्टी मला क्षणार्धात आठवत होत्या. हे सगळं आता थांबणार आहे, हा विचारच खूप भावूक करून गेला. आता हा क्षण खरंच समोर आला आहे, तेव्हा मी फक्त एवढंच सांगेन की मला तुझा खूप अभिमान आहे. फक्त मैदानावर तू मिळवलेल्या यशासाठी नाही, तर या संपूर्ण प्रवासात तू ज्या प्रकारे एक माणूस म्हणून स्वतःला घडवलंस, त्यासाठीही मला तुझा अभिमान आहे. तुझ्या या प्रवासाचा एक भाग बनण्याची आणि तो इतक्या जवळून अनुभवण्याची संधी मिळाली, यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे.’

आई वडिलांनी पत्र लिहित व्यक्त केल्या भावना…

प्रिय अजिंक्य, ‘तुझा कालचा क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा फोन मन हेलावून गेला. 30 वर्षांचा इतिहास डोळ्यासमोर नाचू लागला. बरोबर 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1996-97 या वर्षी तुला डोंबिवलीच्या रेल्वे मैदानावर दाखल केल्यापासून ते आजपर्यंतचा तुझा प्रवास खडतरच होता. कोणत्याही सुविधा, साधने, पाठिंब व अनुभव नसतानाही तुझी इथपर्यंतीची वाटचाल थक्क करणारी होती. दरम्यान, बरेच चढ-उतार, यश-अपयश आले परंतु तू खचला नाहीस तर उलट त्यातू तावून सलाखून निघालास व पुढे भारताचे यशस्वी नेतृत्व केलं. तुझ्यामुळेच आम्हाला वेगळी ओळख मिळाली. आमच्या लेखी तुझ्या यशा-अपयशाच्या गोळाबेरजेपेक्षा तुझा साधेपणा, कायम जमिनीवर असणे, खेळाशी असलेला प्रामाणिकपणा आणि तुझे निष्कलंक क्रिकेट हेच महत्त्वाचे आहे.’

‘जगाने जरी तुझे गोडवे जास्त गायले नसले तरीही तुच आमचा हिरो आहेस. तुझे हितचिंतक, सहकारी, प्रशिक्षक या सर्वांचे ऋण तुझ्यावर कायम असेल हे लक्षात असु दे! तुझ्या आयुष्याचे दुसरे पर्व आता सुरू होत आहे. आम्हा उभयतांचे आशीर्वाद व शुभेच्छा तुझ्या पाठीशी कायम आहेत. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो व तू प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावा हि सदिच्छा’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us