
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने हा निर्णय चुकला असंच वाटलं. पण मधल्या फळीत धनजंय डिसिल्वाने झुंजार खेळी केली. त्याला तळाच्या मिलन रथनायकेची उत्तम साथ दिली. धनंजय डिसिल्वाने 84 चेंडूत 74, तर मिलन रथनायकेने 135 चेंडूचा सामना करत 72 धावा केल्या. यामुळे पहिल्या डावात श्रीलंकेला 236 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 3, गस एटकिनसनने 2, शोएब बशीरने 3 आणि मार्क वूडने 1 गडी बाद केला. या सामन्यात श्रीलंकेची नाजूक स्थिती असताना 109 कसोटी सामन्यांचा अनुभव असलेला खेळाडूकडून अपेक्षा होती. अँजेलो मॅथ्यूज एक अनुभवी फलंदाज आहे. मात्र एका चुकीमुळे संघाचं नुकसान करून बसला.
37 वर्षीय अँजेलो मॅथ्यूज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. संघाची स्थिती नाजूक असताना डाव सावरण्याची अपेक्षा होती. पण 5 चेंडूंचा सामना करत तंबूत परतला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. शून्यावर बाद होणं ही काही मोठी गोष्ट नाही. अनेक दिग्गज खेळाडू शून्यावर बाद झाले आहेत. पण मॅथ्यूज ज्या पद्धतीने बाद झाला ते निराशाजनक होतं. वोक्सचा चेंडू ऑफ स्टंपच्या रेषेत होता, तरीही मॅथ्यूजने वेल लेफ्ट करत बॅट उंचावली आणि इथेच चूक करून बसला. चेंडू पडल्याबरोबर आत घुसला आणि मॅथ्यूजच्या पॅडला लागला.
Bless Angelo Mathews for this leave + review 😅 #ENGvSL pic.twitter.com/enpyGRavZi
— Ricky Mangidis (@rickm18) August 21, 2024
इंग्लंडकडून एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील करण्यात आली. पंचांनी क्षणाचाही विलंब न करता बाद असल्याचं घोषित केलं. त्यामुळे मॅथ्यूजने रिव्ह्यू घेतला. पण हा निर्णयही चुकला असंच म्हणावं लागेल. विकेट पण गेली आणि रिव्ह्यू देखील वाया गेला. त्यामुळे श्रीलंकेला आपल्या डावाच्या 7 व्या षटकातच तिसरी विकेट गमवण्याची वेळ आली. दरम्यान, श्रीलंकेने पहिल्या डावात 10 गडी गमवून 236 धावा केल्या. तर इंग्लंडने या धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडने बिनबाद 22 धावा केल्या आहेत. श्रीलंकेकडे अजूनही 214 धावांची आघाडी आहे.