तारीख अन् ठिकाण ठरलं! वुमन्स प्रीमियर लीगच्या 5व्या हंगामाची घोषणा; पाहा कोणत्या संघाच्या पाकिटात किती कोटी शिल्लक?

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या पाचव्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. 14 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरूवात होणार असून तीन आठवडे क्रीडाप्रेमींना सामन्यांची मेजवानी मिळणार आहे.

तारीख अन् ठिकाण ठरलं! वुमन्स प्रीमियर लीगच्या 5व्या हंगामाची घोषणा; पाहा कोणत्या संघाच्या पाकिटात किती कोटी शिल्लक?
तारीख अन् ठिकाण ठरलं! वुमन्स प्रीमियर लीगच्या 5व्या हंगामाची घोषणा; पाहा कोणत्या संघाच्या पाकिटात किती कोटी शिल्लक?
Image Credit source: WPL Twitter
| Updated on: Sep 16, 2026 | 6:32 PM

महिला क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत, प्रतिष्ठित आणि भव्य लीग असलेल्या वुमन्स प्रीमियर लीग 2027 बाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठी आणि बहुप्रतीक्षित घोषणा केली आहे. या लीगचे आगामी पाचवे ऐतिहासिक पर्व 14 जानेवारी 2027 पासून सुरू होणार आहे. सुमारे तीन आठवडे चालणाऱ्या या टी20 महासंग्रामाचा अंतिम सामना 7 फेब्रुवारी 2027 रोजी खेळवला जाईल. आगामी पाचव्या हंगामासाठी नवीन खेळाडूंची बोली 28 ऑक्टोबर 2026 रोजी लावली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळच्या लिलावाचे ठिकाण बदलण्यात आले असून, हा भव्य लिलाव केरळमधील कोची येथे आयोजित केला जाईल. लिलावात उतरण्यापूर्वी सर्व पाच फ्रँचायझींना आपल्या संघात कोणत्या खेळाडूंना कायम ठेवायचे आहे आणि कोणाला सोडायचे आहे, याची अधिकृत यादी 28 सप्टेंबर 2026 पर्यंत बीसीसीआयकडे सुपूर्द करावी लागणार आहे.

फ्रेंचायझींच्या पर्समध्ये किती रक्कम शिल्लक?

प्रत्येक संघात जास्तीत जास्त 18 खेळाडू असू शकतात, ज्यापैकी कमाल सहा खेळाडू परदेशी असू शकतात. सध्याच्या हंगामासाठी वेतन मर्यादा 15 कोटी रुपये आहे. पण या रकमेतून बेरीज वजाबाकी करताना थोडी फार रक्कम प्रत्येक फ्रेंचायझीकडे आहे. वुमन्स प्रीमियर लीग 2027 या मिनी लिलावात खेळाडू खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वाधिक 4.80 कोटी रुपयांचे बजेट शिल्लक आहे. त्यांच्या पाठोपाठ यूपी वॉरियर्झ 3.90 कोटी आणि गुजरात जायंट्स 3.20 कोटींच्या शिल्लक रक्कमेसह लिलावाच्या मैदानात उतरणार आहेत. दुसरीकडे, आपला मुख्य संघ कायम ठेवणाऱ्या गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 1.75 कोटी शिल्लक आहेत, तर दोन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडे या लिलावासाठी सर्वात कमी म्हणजे अवघे 1.35 कोटी रुपयांचे बजेट शिल्लक आहे. त्यामुळे आता या बजेटमध्ये चांगले खेळाडू घेण्याचं मोठं आव्हान फ्रेंचायझींपुढे आहे.

वुमन्स प्रीमियर लीगच्या आतापर्यंतच्या चार पर्वांमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद पटकावून आपले वर्चस्व राखले आहे. 2023 मधील पहिल्या आणि 2025 च्या तिसऱ्या पर्वात मुंबई इंडियन्सने अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्झचा पराभव करत ट्रॉफी उंचावली. तर, 2024 च्या दुसऱ्या आणि नुकत्याच पार पडलेल्या 2026 च्या चौथ्या पर्वात आरसीबीने अनुक्रमे दिल्ली आणि मुंबईचा पराभव करत आपले दुसरे जेतेपद मिळवले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us