मॅच फिक्सिंग की चूक! पाकिस्तान खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात, मोहम्मद अमिरसारखंच केलं

Asad Akhtar Bowled Big No Ball: पाकिस्तानात देशांतर्गत टी20 कप खेळलात जात आहे. या स्पर्धेत एक गोलंदाज संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या गोलंदाजाने एक नो बॉल असा टाकला की संशयाला वाव आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मॅच फिक्सर मोहम्मद आमिर चर्चेत आला आहे.

मॅच फिक्सिंग की चूक! पाकिस्तान खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात, मोहम्मद अमिरसारखंच केलं
मॅच फिक्सिंग की चूक! पाकिस्तान खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात, मोहम्मद अमिरसारखंच केलं
Image Credit source: X/GETTY
| Updated on: Mar 16, 2026 | 3:07 PM

पाकिस्तानी क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगचं नातं काही नवीन राहिलेलं नाही. भूतकाळात अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत. पाकिस्तानी क्रिकेटचा इतिहास मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगच्या काळ्या अध्यायाने लिहिला गेला आहे. 2010 या वर्षात मोहम्मद आमिरचं स्पॉट फिक्सिंग स्कँडल उघडकीस आलं होतं. त्याने जाणीवपूर्वण नो बॉल टाकला होता. नो बॉलच्या कितीतरी पुढे जाऊन त्याने हा चेंडू फेकला होता. त्यामुळे लगेचच संशय आला आणि चौकशी केली गेली. चौकशीत दोषी आढळल्यानंतर मोहम्मद आमिरवर 5 वर्षांची बंदी घातली गेली. आता पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये असंच प्रकरण समोर आलं आहे. क्रिकेटप्रेमींना तसाच संशय आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 25 वर्षीय वेगवान गोलंदाज असद अख्तरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याने आता कुठे क्रिकेट कारकि‍र्दीला सुरूवात केली असून 5 टी20 सामने खेळले आहेत.

नेमकं काय घडलं?

पाकिस्तानात देशांतर्गत नॅशनल टी20 कप खेळला जात आहे. या स्पर्धेतील 16वा सामना कराची रिजन ब्लूज आणि लाहोर रिजन ब्लूज यांच्यात खेळला गेला. हा सामना 14 मार्च 2026 रोजी पेशावरच्या इम्रान खान क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. यात कराचीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तसेच 206 धावांचा मजबूत धावसंख्या उभारली. लाहोरचा संघ 149 धावांवर सर्वबाद झाला. कराचीने हा सामना 57 धावांनी जिंकला. हा सामना कराचीने जिंकला असला तरी एक षटक चर्चेत आलं आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज असद अख्तरने एक षटक टाकलं आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

या षटकात असद अख्तरने दोन नो बॉल आणि 2 वाइ़ड चेंडू टाकले. या षटकात एकूण 21 धावा आल्या. तसेच एकही विकेट मिळाला नाही. यात असद अख्तरने फुट फॉल्ट नो बॉल टाकला. त्याचा पाय नो बॉल रेषेच्या खूपच पुढे होता. असा नो बॉल टाकणं खरं तर अशक्य असतं. क्रिकेटप्रेमींच्या मते, एका षटकात इतक्या अवांतर धावा देणं संशयास्पद आहे. संघ मजबूत स्थितीत असताना अशी गोलंदाजी करणं, काही तरी गडबड असल्याचं सांगतं. सोशल मीडियावर यावरून रान उठलं आहे. काही युजर्संनी तर स्पॉट फिक्सिंग असल्याचं सांगितलं आहे. इतकंच काय तर अनेकांनी याची तुलना मोहम्मद आमिरच्या प्रकरणाशी केली आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

 

Follow Us