
एशेज कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना एडिलेड ओव्हल मैदानात होत आहे. या सामन्यातील चार दिवसांचा खेळ संपला असून निर्णायक स्थितीवर आला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड दिसत आहे. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 4 विकेटची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात 371 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 286 धावांपर्यंत मजल मारू शकला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे 85 धावांची आघाडी होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात 349 धावा केल्या. तसेच पहिल्या डावातील आघाडीसह 434 धावा झाल्या आणि विजयासाठी 435 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव गडगडला. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 6 गडी गमवून 207 धावा केल्या आहेत. अजूनही इंग्लंडचा संघ 228 धावांनी पिछाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियाने कसोटी सामना विजयासाठी दिलेल्या 435 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव गडगडला. संघाच्या 4 धावा असताना पहिला धक्का बसला. बेन डकेट बाद झाल्याने इंग्लंडवर दबाव वाढला. त्यानंतर 31 धावा असताना बेन डकेट तंबूत परतला. त्यानंतर झॅक क्राउली आणि जो रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. पण जो रूट मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. त्याने 63 चेंडूत 39 धावा केल्या आणि कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर झॅक क्राउलीने हॅरी ब्रूकसह डाव पुढे नेला. या दोघांमध्ये चौथ्या विकेसाठी 68 धावांची भागीदारी झाली. हॅरी ब्रूक 30 धावा करून तंबूत गेला. बेन स्टोक्स आला तसाच परत गेला. त्याने फक्त 5 धावा केल्या.
झॅक क्राउली 85 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडच्या आशा संपुष्टात आल्या. कारण त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 6 गडी गमवून 207 धावा केल्या आहेत. जेमी स्मिथ नाबाद 2 आणि विल जॅक्स नाबाद 11 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी पाचव्या दिवशी फक्त 4 विकेट्सची गरज आहे. पाचव्या दिवशी हे गणित जुळून येईल यात काही शंका नाही. तर इंग्लंडला विजयासाठी 228 धावांची गरज आहे. पण या धावा गाठणं वाटतं तितकं सोपं नाही.