
इंग्लंडचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाज जो रुट याचा कसोटी क्रिकेटमध्ये झंझावात सातत्याने सुरुच आहे. जो रुटला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखणं प्रतिस्पर्धी संघांसाठी दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. जो रुटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एशेस सीरिजमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं आहे. रुटने ब्रिस्बेनमधील द गाबा इथे पिंक बॉल टेस्टमध्ये शेकडा पूर्ण केला. रुटने या शतकासह 12 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. रुटचं हे कसोटी क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियातील पहिलंवहिवं शतक ठरलं.
जो रुटने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात 16 कसोटी सामने खेळले आहेत. रुट ऑस्ट्रेलियात 30 व्या डावानंतर शतक करण्यात यशस्वी ठरला. रुटने या आधी ऑस्ट्रेलियात 9 कसोटी अर्धशतकं केली. मात्र त्याला एकदाही शतकापर्यंत पोहचता आलं नव्हतं. मात्र अखेर एका तपाच्या प्रतिक्षेनंतर रुटने ऑस्ट्रेलियात शतक झळकावलं.
रुटला ऑस्ट्रेलियात कसोटी कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक करण्यासाठी 181 चेंडूंचा सामना करावा लागला. रुटचं हे कसोटीतील 40 वं शतक ठरलं. रुटने यासह कसोटीत सर्वाधिक शतकं करणाबाबत श्रीलंकेच्या कुमार संगकारा याला मागे टाकलं. आता या यादीत रुटच्या पुढे जॅक कॅलिस आणि सचिन तेंडुलकर हे 2 दिग्गज फलंदाज आहेत.
जो रुटची या शतकी खेळीदरम्यान चांगलीच कसोटी पाहायाला मिळाली. इंग्लंडने डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये बेन डकेट याची विकेट गमावली. मिचेल स्टार्क याने डकेटला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर ओली पोप याला भोपळाही फोडता आला नाही. स्टार्कनेच पोपला आऊट केलं. पोप आऊट झाल्यानंतर जो रुट मैदानात आला.
डकेट आणि पोप हे दोघे झटपट आऊट झाल्यानंतर जो रुट याच्यावर इंग्लंडचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. रुटने ही जबाबदारी सार्थपणे पार पाडली. रुटने झॅक क्रॉली याच्यासह इंग्लंडच्या डावाला स्थिरता मिळवून दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्यानतंर झॅक क्रॉली आऊट झाला. त्यानतंर हॅरी ब्रूक मैदानात आला. रुट आणि ब्रूक या जोडीने चौथ्या विकेटसाठी 54 धावा जोडल्या. त्यानंतर कॅप्टन बेन स्टोक्स चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला. स्टोक्सने 19 धावा केल्या. तर जेमी स्मिथ आला तसाच परत गेला.
एका बाजूला सातत्याने विकेट्स जात होते. तर दुसऱ्या बाजूला जो रुट याने एक बाजू लावून धरली ही. रुटने विल जॅक्स याच्यासह 40 धावा जोडल्या. रुटने अशाप्रकारे ऑस्ट्रेलियातील पहिलंवहिलं कसोटी शतक पूर्ण केलं.