Ashes Series : ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या टेस्टसाठी टीम जाहीर, कॅप्टन आऊट, नेतृ्त्व कुणाकडे?

Australia vs England Ashes Series 2025 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यात टी 20i मालिकेचा थरार सुरु असताना यजमान संघाने एशेस सीरिजमधील पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.

Ashes Series : ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या टेस्टसाठी टीम जाहीर, कॅप्टन आऊट, नेतृ्त्व कुणाकडे?
Test Cricket
Image Credit source: AFP
| Updated on: Nov 05, 2025 | 4:29 PM

ऑस्ट्रेलिया सध्या मायदेशात टीम इंडिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळत आहे. ही मालिका 3 सामन्यांनंतर 1-1 ने बरोबरीत आहे. उभयसंघातील चौथा सामना हा 6 नोव्हेंबरला होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया बोर्डाने इंग्लंड विरूद्धच्या आगामी एशेस सीरिजमधील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची दिली आहे.

स्टीव्हन स्मिथ कॅप्टन

ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी 15 खेळाडूंना संधी दिली आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 21 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये होणार आहे. या पहिल्या सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याला दुखापतीमुळे मुकावं लागलं आहे. त्यामुळे पॅटच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

एकामुळे दुसरा बाहेर!

निवड समितीने पहिल्या सामन्यासाठी मार्नस लबुशेन याला संधी दिली आहे. लबुशेनचं या निमित्ताने अनेक महिन्यांनी कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. लबुशेनला 2025 च्या सुरुवातीला टीममधून बाहेर करण्यात आलं होतं. मात्र लबुशेन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर संघात पुन्हा एकदा स्थान मिळवलं. लबुशेनने क्वीसलँडकडून खेळताना 8 डावात 5 शतकं झळकावली आहेत. मात्र लबुशेन याच्या कमबॅकमुळे सॅम कॉन्स्टास याला डच्चू देण्यात आलं आहे.

तसेच ऑस्ट्रेलिया संघात तब्बल 7 वर्षात ब्रँडन डोगेट याचं कमबॅक झालं आहे. ब्रँडनला 7 वर्षांआधी संघात स्थान मिळालं आहे. मात्र तेव्हा ब्रँडनला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आता 7 वर्षांनंतर प्रतिक्षा संपणार का? याकडे ब्रँडनचं लक्ष असणार आहे. जॅक वेदरॉल्ड याची पहिल्यांदाच कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.

इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान

दरम्यान एशेस सीरिजमध्ये बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंड या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाला घरच्या परिस्थितीचा फायदा होणार आहे. त्यामुळे इंग्लंड प्रतिकूल परिस्थितीत कशी कामगिरी करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार?

इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), शॉन एबट, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, ब्रँडन डोगेट, कॅमरुन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल स्टार्क, झॅक वेदरॉल्ड आणि ब्यू वेब्स्टर.