
भारतीय क्रिकेट संघ आतापर्यंत पाकिस्तानवर वरचढ राहिला आहे. भारताने असंख्य सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला आहे.या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांच्या सामन्याची फक्त भारत आणि पाकिस्तान नाही तर साऱ्या क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असते. यंदा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही दोन्ही संघ आशिया कप 2025 स्पर्धेत आमनेसामने असणार आहेत. उभयसंघातील हा सामना रविवारी 14 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र भारताची दुबईत पाकिस्तान विरुद्ध निराशाजनक कामगिरी राहिली आहे. उभयसंघात दुबईतील या स्टेडियममध्ये आतापर्यंत किती टी 20i सामने झाले आहेत? भारताने त्यापैकी किती सामने जिंकले आहेत? हे जाणून घेऊयात.
भारताने आशिया कप 2025 स्पर्धेत यूएईवर 93 चेंडू राखून आणि 9 विकेट्सने विजय मिळवला. भारताला या मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयाचा फायदा झाला. भारताने ए ग्रुपमधीर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. तर पाकिस्तानने ओमानला पराभूत करत पहिलाच सामना जिंकला. पाकिस्तानने यासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसर्या स्थानी झेप घेतली.
आता 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा एकमेकांविरुद्ध विजय मिळवून सुपर 4 मधील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र दुबईतील भारताची आकडेवारी पाहता भारताला या सामन्यात सहजासहजी जिंकता येणार नाही. भारताची या मैदानात पाकिस्तान विरुद्ध काही खास कामगिरी राहिली नाहीय.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबईत आतापर्यंत एकूण 3 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. पाकिस्तानने या 3 पैकी सर्वाधिक 2 सामने जिंकले आहेत. तर भारताला पाकिस्तान विरुद्ध दुबईत एकमेव सामना जिंकण्यात यश आलं आहे. पाकिस्तानने या 2 पैकी एका सामन्यात भारताचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यामुळे दुबईत उभयसंघात चढाओढ असणार आहे.
उभयसंघात आतापर्यंत 12 महिन्यात तिन्ही टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 दरम्यान दोन्ही संघात 3 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. उभयसंघात झालेला पहिला तसेच तिसरा आणि शेवटचा सामना हा पाकिस्तानने जिंकला आहे. तर भारताने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
उभयसंघात 24 ऑक्टोबर 2021 ला दुबईत पहिलावहिला टी 20i सामना खेळवण्यात आला. पाकिस्तानने या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत 10 विकेट्सने भारताचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ 28 ऑगस्ट 2022 रोजी आमनेसामने आले. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात करत पहिल्या पराभवाची परतफेड केली होती. तर उभयसंघात दुबईत तिसरा आणि शेवटचा सामना हा 4 सप्टेंबर 2022 रोजी झाला होता. तेव्हा पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडिया रविवारी विजय मिळवत पाकिस्तानचा दुबईतील हिशोब बरोबर करणार का? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.