
आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने शुक्रवारी ओमानवर 21 धावांनी मात करत सलग तिसरा विजय मिळवला. यासह साखळी फेरीची सांगता झाली. साखळी फेरीतून 4 संघांनी सुपर 4 साठी तिकीट मिळवलं. तर इतर 4 संघांचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. यूएई, ओमान, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचं पॅकअप झालं. तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश संघ सुपर 4 साठी पात्र ठरले. सुपर 4 फेरीतील पहिला सामना 20 सप्टेंबरला बी ग्रुपमधील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना रविवारची प्रतिक्षा आहे. कारण पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. दोन्ही संघ साखळी फेरीनंतर सुपर 4 मध्ये आमनेसामने असणार आहेत.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 सामना रविवारी 21 सप्टेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह मॅच पाहता येईल.
भारताने गेल्या रविवारी 14 सप्टेंबरला पाकिस्तानवर सहज आणि एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे आता टीम इंडिया पाकिस्तानला पुन्हा पराभूत करून सुपर 4 फेरीची विजयाने सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. तर पाकिस्तान साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशात टीम इंडिया पुन्हा पाकिस्तान विरुद्ध एकतर्फी फरकाने जिंकणार की पाकिस्तान आव्हान देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान टीम इंडिया आतापर्यंत अजिंक्य आहे. भारताने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले. भारताने यूएई, पाकिस्तान आणि ओमानला पराभूत केलं. तर पाकिस्तानने 2 सामने जिंकले. पाकिस्तानने यूएई आणि ओमानवर विजय मिळवला. मात्र भारताकडून पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे पाकिस्तान दुसऱ्यांदा टीम इंडिया विरुद्ध कोणत्या रणनितीने मैदानात उतरते? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.