IND vs NZ : अभिषेक शर्माला कडक ओपनिंगची संधी, पहिल्याच सामन्यात युवराजचा विक्रम निशाण्यावर, फक्त 2 फटक्यांची गरज
Abhishek Sharma IND vs NZ 1st T20i : अभिषेक शर्मा याच्या निशाण्यावर पहिल्याच टी 20i सामन्यात मोठा विक्रम आहे. अभिषेककडे त्याचा गुरु युवराज सिंह याला मागे टाकून टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा सहावा फलंदाज होण्याची संधी आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर आता 21 जानेवारीपासून टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंडने भारताचा एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभव करुन इतिहास घडवला. न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात एकदिवसीय मालिका जिंकली. त्यानंतर आता बुधवारपासून 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांची ही 2026 मधील पहिली आणि वर्ल्ड कप स्पर्धेआधीची शेवटची टी 20I मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या मालिकेत जबरदस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्याला विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याला पहिल्याच सामन्यात खास कामगिरी करण्याची संधी आहे. अभिषेककडे त्याचा गुरु आणि भारताचा माजी ऑलराउंडर सिक्सर किंग अर्थात युवराज सिंग याला सर्वाधिक टी 20I सिक्सबाबत पछाडण्याची संधी आहे.
अभिषेक शर्मा याने कमी काळात भारतीय टी 20I संघातील आपलं स्थान पक्क केलं. अभिषेकने टी 20I वर्ल्ड कप 2024 नंतरच्या पहिल्याच मालिकेत झिंबाब्वे विरुद्ध पदार्पण केलं. अभिषेक तेव्हापासून अपवाद वगळता सातत्याने धावा करत आहे. त्यामुळे अभिषेक भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू झाला आहे. अभिषेकने भारताला आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये स्फोटक सुरुवात करुन दिली आहे. त्यामुळे अभिषेकला नागपुरात युवराजला मागे टाकण्याची संधी आहे.
अभिषेक शर्मा युवराज सिंहला पछाडणार!
टीम इंडियासाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक 205 सिक्सचा विक्रम हा माजी फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर आहे. तर युवराज सिंह या यादीत सहाव्या तर अभिषेक शर्मा सातव्या क्रमांकावर आहे. युवराजला मागे टाकण्यासाठी अभिषेकला फक्त 2 षटकारांची गरज आहे. त्यामुळे अभिषेक व्हीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियासाठी सर्वाधिक टी 20I सिक्स
रोहित शर्मा : 205 षटकार सूर्यकुमार यादव : 155 षटकार विराट कोहली : 124 षटकार हार्दिक पांड्या : 106 षटकार केएल राहुल : 99 षटकार युवराज सिंह : 74 षटकार अभिषेक शर्मा : 73 षटकार
अभिषेक आणि युवराजची कामगिरी
युवराजने टी 20I कारकीर्दीतील 58 सामन्यांमध्ये 74 षटकार लगावले आहेत. तर अभिषेकने आतापर्यंत फक्त 33 सामन्यांमध्ये 73 सिक्स ठोकले आहेत.
