Video: सुपर 4 फेरीपूर्वी पाकिस्तानचा हसवणारा सराव, तुम्ही पाहिलात का? असे गिरवतात धडे
आशिया कप 2025 स्पर्धेत भारत पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा सराव सुरु आहे. यात खेळाडूंना झेल पकडण्याचा.. नाही सोडण्याचा सराव देण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे क्रीडारसिक त्यांची चांगलीच मजा घेत आहेत.

आशिया कप 2025 स्पर्धेचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताने साखळी फेरीत पाकिस्तानचा दारूण पराभव केला होता. आता सुपर 4 फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघ पु्न्हा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यासाठी सज्ज आहे. तसेच 2022 मधील वचपाही काढणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघही कसून सराव करत आहे. पण सराव देणाऱ्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. कारण सराव सामन्यावेळीचा व्हिडीओ पाहिला तर तसंच म्हणावं लागेल. सरावाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर क्रीडाप्रेमी पाकिस्तान संघाची तुलना गल्लीतील संघाशी करत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ स्पर्धेच्या सुरुवातीच्या असल्याचं बोललं जात आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सरावाच्या व्हायरल व्हिडीओत चार खेळाडू आहे. तसेच मुख्य प्रशिक्षक माइक हेसनच्या देखरेखीखाली त्यांचा सराव होत आहे. व्हिडीओत स्पष्ट दिसतं की माइक हेसन पाकिस्तानी खेळाडूंचा झेल पकडण्याचा सराव घेत आहेत. यात हारिस रऊफ आणि मोहम्मद नवाज यांचा समावेश आहे. पण त्यांची स्थिती एक सारखी आहे. प्रशिक्षकाला अपेक्षित कामगिरी कोणीच करताना दिसत नाही. झेल पकडण्याचा सराव आहे की सोडण्याचा असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी विचारत आहेत. कारण माइक हेसन त्यांना उडी मारून झेल पकडण्याचा सराव त्यांच्याकडून करवून घेत आहेत. पण झेल कोणीच पकडत नाही. खेळाडू उड्या तर मारतात. पण महत्त्वाचा असलेला झेल मात्र सोडत आहेत.
View this post on Instagram
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा झेल सोडण्याचा विक्रम सर्वश्रूत आहे. सोपे झेल पकडणंही पाकिस्तानला कठीण होतं. पाकिस्तान संघाने 2024 पासून आशिया कप 2025 सुरु होण्यापूर्वी एकूण 48 झेल सोडले आहेत. तसेच 89 वेळा गचाळ क्षेत्ररक्षण केलं आहे. ही आकडेवारी पाहता पाकिस्तानची स्थिती कळून येईल. इतकंच काय तर सरावतही पाकिस्तानचे खेळाडू अशीच कामगिरी करतात. दरम्यान, 21 सप्टेंबरला भारत पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. साखळी फेरीत भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला होता. आताही तशी अपेक्षा भारतीय क्रीडाप्रेमींना आहे.
