IND vs PAK : सूर्या-तिलकची चाबूक खेळी, टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा

Asia Cup 2025 India vs Pakistan Match Result : भारतीय क्रिकेट संघाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. भारताने या विजयासह सुपर 4 मध्ये धडक दिली आहे.

IND vs PAK : सूर्या-तिलकची चाबूक खेळी, टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा
Tilak Varma and Suryakumar Yadav IND vs PAK
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Sep 14, 2025 | 11:49 PM

टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने यूएईनंतर आज रविवारी 14 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 3 विकेट्स गमावून आणि 25 बॉलआधी पूर्ण केलं. टीम इंडियाने 15.5 ओव्हरमध्ये 131 धावा केल्या.  अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या तिघांनी बॅटिंगने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर त्याआधी कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने एकूण 5 विकेट्स घेत पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं.

टीम इंडियाची बॅटिंग

अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 22 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल स्टंपिंग आऊट झाला. शुबमनने 10 धावा केल्या. त्यानंतर अभिषेक आणि कॅप्टन सूर्याने दुसऱ्या विकेटसाठी 19 धावा जोडल्या. अभिषेक फटकेबाजीच्या प्रयत्नात आऊट झाला. अभिषेकने 13 बॉलमध्ये 238.46 च्या स्ट्राईक रेटने 31 रन्स केल्या. अभिषेकने या खेळीत 2 सिक्स 4 फोर लगावले.

तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

अभिषेक आऊट झाल्यानंतर सूर्याला साथ देण्यासाठी तिलक वर्मा मैदानात आला. या दोघांनी संयमी खेळी केली. तसेच या जोडीने संधी मिळेल तेव्हा फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीलाच भारताला विजयी करण्याची संधी होती. मात्र तिलक वर्मा आऊट झाला. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 56 रन्सची पार्टनरशीप केली. तिलकने 31 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.

तिलकनंतर ऑलराउंडर शिवम दुबे मैदानात आला. शिवम आणि सूर्या या मुंबईकर जोडीने टीम इंडियाला विजयी केलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नॉट आऊट 34 रन्सची पार्टनरशीप केली. शिवमने 1 सिक्ससह 7 बॉलमध्ये नॉट आऊट 10 रन्स केल्या. तर सूर्याने 37 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 47 धावा केल्या. पाकिस्तानसाठी एकट्या सॅम अयुब याने तिन्ही विकेट्स घेतल्या. तर इतर गोलंदाजांची भारतीय फलंदाजांनी धुलाई केली.

टीम इंडियाची सुपर 4 मध्ये धडक

टीम इंडियाने या सलग दुसऱ्या विजयासह सुपर 4 मध्ये धडक दिली आहे. एसीसीने याबाबत माहिती दिली नाहीय.मात्र नियमानुसार, सुपर 4 साठी 2 सामने जिंकणं आवश्यक आहे. त्यानुसार भारताने 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताने आपलं स्थान निश्चित केलं आहे.

पहिल्या डावात काय झालं?

दरम्यान त्याआधी टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या पाकिस्तानला टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 127 धावाच करता आल्या. पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहान याने 40 धावा केल्या. तर शाहिन आफ्रिदी याने नाबाद 33 रन्स केल्या. टीम इंडियासाठी कुलदीप यादव याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्थी या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.