
आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 फेरीतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने बुधवारी 24 सप्टेंबरला बांगलादेशवर मात केली. टीम इंडियाचा हा सुपर 4 फेरीतील सलग दुसरा विजय ठरला. तसेच या सामन्याच्या निकालासह आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघही निश्चित झाला. टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली. आता टीम इंडिया अंतिम फेरीत कुणाविरुद्ध भिडणार? याचा निकाल काही तासांनी लागणार आहे. अंतिम फेरीतील एका जागेसाठी आता 2 संघांमध्ये थेट लढत होणार आहे. सुपर 4 मधील पाचव्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना गुरुवारी 25 सप्टेंबरला होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता टॉस होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
सलमान आगा हा बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर लिटन दास या सामन्यात बांगलादेशचं नेतृत्व करणार की नाही? याबाबत शंका आहे. कारण लिटनला दुखापतीमुळे टीम इंडिया विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलं. त्यामुळे लिटन पुढील काही तासात फिट न झाल्यास झाकेर अली हा नेतृत्व करताना दिसू शकतो.
सुपर 4 फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने खेळले आहेत. बांगलादेशने सुपर 4 फेरीत श्रीलंकेला पराभूत करत विजयी सुरुवात केली होती. त्यामुळे बांगलादेशकडे भारताला पराभूत करत अंतिम फेरीचा दावा आणखी मजबूत करण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे बांगलादेशसाठी अंतिम फेरीच्या हिशोबाने पाकिस्तान विरुद्धचा सामना आर या पार असा असणार आहे. तर पाकिस्तानचीही सारखीच स्थिती आहे.
पाकिस्तानला सुपर 4 मध्ये 21 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर 23 सप्टेंबरला पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवला. आता 25 सप्टेंबरला पाकिस्तान विजय मिळवत या स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध तिसऱ्यांदा भिडणार की बांगलादेश अंतिम फेरीत पोहचणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.