IND vs BAN Super 4 : बांगलादेशने टॉस जिंकला, टीम इंडियाला बॅटिंगची संधी, धुलाई फिक्स! कॅप्टन बदलला
India vs Bangladesh Super 4 Toss Result : टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत बहुतांश वेळा पहिल्या डावात फिल्डिंग केली आहे. मात्र आता बांगलादेश विरुद्ध भारताला बॅटिंगची संधी मिळाली आहे. त्यामुळे चाहत्यांना टीम इंडियाच्या फलंदाजांकडून स्फोटक खेळीची आशा आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेतील 16 व्या आणि साखळी फेरीतील चौथ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर फेरीतील दुसरा सामना आहे. दोन्ही संघ या फेरीत अजिंक्य आहेत. त्यामुळे दोन्ही संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र एका संघाचा पराभव होणार हे निश्चित आहे. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. बांगलादेशच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. बांगलादेशने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या फलंदाजांकडून फटकेबाजीची आशा आहे.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल, कॅप्टन बदलला
टीम इंडियाने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम मॅनेजमेंटने पाकिस्तान विरूद्धच्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र बांगलादेशने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1-2 नाही तर तब्बल 4 बदल केले आहेत. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे लिटनच्या जागी या सामन्यात झाकेर अली नेतृत्व करत आहे. लिटनला सरावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे लिटन या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचं झाकेरने टॉस दरम्यान सांगितलं. बांगलादेशने त्या व्यतिरिक्त प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत.
कोण मिळवणार सलग दुसरा विजय?
दरम्यान दोन्ही संघांनी सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत विजयी सलामी दिली. तर टीम इंडियाने साखळी फेरीनंतर सुपर 4 फेरीत पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवलं. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणता संघ विजयी घोडदौड कायम राखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : सैफ हसन, तंझीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमॉन, तॉहीद हृ दॉय, शमीम हुसैन, जाकेर अली (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, नसुम अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.
