
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. आगरकर यांनी या 15 खेळाडूंची नावं वाचून दाखवली. आशिया कप स्पर्धेसाठी श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल या दोघांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. श्रेयस आणि यशस्वी दोघांना वगळल्याने भारताचा माजी सलामीवीर सदागोपन रमेशने हेड कोच गौतम गंभीर याच्यावर मोठा आरोप केला आहे. रमेशनुसार, गंभीर त्याच्या आवडत्या खेळाडूंनाच संधी देतो. गंभीरने कोच म्हणून भारताला आतापर्यंत फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात श्रेयस अय्यर याचं मोठं योगदान होतं.
“गौतम गंभीर त्याच्या आवडत्या खेळाडूंनाच सपोर्ट करतो. मात्र जे आवडत नाहीत त्यांना सोडून टाकतो. इंग्लंड विरुद्धची मालिका भारताने बरोबरीत सोडवली. ही मोठी अचिव्हमेंट समजली जात आहे, कारण भारताची गेल्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी राहिली. रवी शास्त्री आणि विराट कोहली या दोघांनी विदेशात सातत्याने कसोटी मालिका जिंकण्याची सुरुवात केली होती. आता ट्रॅक रेकॉर्ड म्हणून इंग्लंडमध्ये मालिका बरोबरीत सोडवणं हीच गंभीरची अचिव्हमेंट आहे”, असं सदागोपन रमेशने त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं.
“भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणं हीच गंभीरची मोठी कामगिरी आहे. यात श्रेयसने अय्यरने निर्णायक भूमिका बजावली होती. त्यानंतरही गंभीर श्रेयसला सपोर्ट करत नाहीय. यशस्वी सारखे खेळाडू हे एक्स फॅक्टर असतात. त्यामुळे त्याला सर्व फॉर्मेटमध्ये खेळवायला हवं. त्याला राखीव म्हणून ठेवणं फार चुकीचं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत केलेली कामगिरी पाहता अय्यरला एकदिवसीय संघात कायम ठेवायला हवं. खेळाडूंना समर्थन द्यायला हवं, जेणेकरुन त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि कामगिरी कायम राहिल”, असंही सदागोपन रमेशने म्हटलं.
श्रेयसने गेल्या काही महिन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. श्रेयसने आयपीएलच्या 18 व्या मोसमात पंजाब किंग्सचं नेतृत्व केलं. श्रेयसने पंजाबला त्याच्या नेतृत्वात उपविजेता केलं. तसेच श्रेयसने बॅटिंगनेही मनं जिंकली. श्रेयसने 18 व्या मोसमातील 17 सामन्यांमध्ये 50.33 च्या सरासरीने एकूण 604 धावा केल्या. त्यानंतरही श्रेयस अय्यर याला टी 20 आशिया कप 2025 साठी संधी देण्यात आली नाही.