
टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेतील 17 व्या आणि सुपर 4 मधील पाचव्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 4 मधील तिसरा आणि शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर टीम इंडियाने या दोघांना पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिलीय. त्यामुळे आता अंतिम फेरीतील दुसऱ्या जागेसाठी पाकिस्तान-बांगलादेश यांच्यात थेट लढत होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. बांगलादेशने टॉस जिंकला. लिटन दास याच्या अनुपस्थिततीत हंगामी कर्णधार झाकेर अली याने फिल्डिंगचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगला भाग पाडलं आहे. त्यामुळे आता बांगलादेश पाकिस्तानला किती धावांवर रोखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पाकिस्तान श्रीलंकेविरुद्धच्याच प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरली आहे. तर बांगलादेशने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदलाची मालिका कायम ठेवली आहे. बांगलादेशने टीम इंडिया विरुद्ध 24 सप्टेंबरला 4 बदल केले होते. त्यानंतर आता पाकिस्तान विरुद्ध 3 बदल केले आहेत.
तंजीद हसन तमीम, मोहम्मद सैफुद्दीन आणि नसुम अहमद या तिघांचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. तर या तिघांच्या जागी नुरुल हसन, तास्किन अहमद आणि महेदी हसन यांना संधी दिली आहे.
दरम्यान दोन्ही संघांची आशिया कप 2025 स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात चढाओढ असणार आहे. त्यामुळे कोणता संघ हा सामना जिंकून टीम इंडिया विरुद्ध अंतिम फेरीत खेळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आघा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ आणि अबरार अहमद.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : सैफ हसन, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, जाकेर अली(कॅप्टन आणि विकेटकीपर), नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.