
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र स्पर्धेच्या एक महिन्याआधीपासूनच भारतीय क्रिकेट वर्तुळात उत्सुकतेचं तसेच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया विश्रांतीवर आहे. टीम इंडिया या दौऱ्यानंतर थेट आशिया कप स्पर्धेत खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे निवड समिती आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात कुणाला संधी देणार आणि कुणाला वगळणार? याची उत्सूकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
आशिया कप स्पर्धेसाठी पीसीबीने 17 ऑगस्टला 17 सदस्यीय संघ जाहीर करत आघाडी घेतली. पाकिस्तान या स्पर्धेसाठी खेळाडूंची नाव जाहीर करणारी पहिलीच टीम ठरली. मात्र भारतीय संघात तोडीसतोड खेळाडू असल्याने कुणाला घ्यायचं आणि कुणाला वगळायचं? हा सर्वात मोठा पेच बीसीसीआय निवड समितीसमोर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे.
मुंबईच्या बीसीसीआय मुख्यालयात या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. त्याआधी निवड समिती आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात बैठक पार पडणार आहे. निवड समिती या स्पर्धेसाठी काही आश्चर्यकारक निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इतर खेळाडूंना निवड समिती या स्पर्धेत संधी देण्यासाठी इच्छूक नाही.
शुबमनने इंग्लंड विरूद्धच्या या कसोटी मालिकेतून कर्णधार म्हणून पदार्पण केलं. शबुमनने या 5 सामन्यांच्या मालिकेत 750 पेक्षा अधिक धावा केल्या. शुबमन यासह एका मालिकेत भारतासाठी सुनील गावसकर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारा भारतीय ठरला. तसेच शुबमनने त्याआधी आयपीएलच्या 18 व्या मोसमात 650 धावा केल्या. मात्र त्यानंतरही शुबमनला आशिया कप स्पर्धेसाठी संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी निवड समितीची पहिली पसंत असल्याचं निश्चित म्हटलं जात आहे. तर शुबमनचा बॅकअप ओपनर म्हणून समावेश केलं जाणार असल्याचं म्हटलं जात होतं.
बॅकअप ओपनर म्हणून शुबमन आणि यशस्वी जैस्वाल या दोघांमध्ये चुरस आहे. मात्र शुबमनच्या तुलनेत यशस्वीला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आता कुणाला संधी मिळते? हे संघ जाहीर झाल्यानतंरच स्पष्ट होईल.
टीम इंडियाने 2023 आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा 10 धावांनी धुव्वा उडवला होता. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने त्या सामन्यात श्रीलंकेला झटपट गुंडाळलं होतं. सिराजने त्या सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र गत आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटने खेळवण्यात आली होती. तर यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे सिराजला या संघात स्थान मिळणार नसल्याचा दावा क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.