
आशिया कप 2025 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा 19 ऑगस्टला करण्यात आली. आशिया कप स्पर्धा यंदा टी 20 फॉर्मटेने होणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर सूर्या टी 20i संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळतोय. मात्र सूर्यासाठी कर्णधार म्हणून ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. तसेच टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील गतविजेता आहे. त्यामुळे सूर्यासमोर कॅप्टन म्हणून ट्रॉफी राखण्याचं आव्हान असणार आहे. तसेच सूर्याला या स्पर्धेत काही फलंदाजांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
सूर्याला टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पुढे जाण्याची संधी आहे. सूर्याकडे ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल आणि विंडीजचा माजी क्रिकेटर निकोलस पूरन या दोघांना मागे टाकण्याची संधी आहे. सूर्याला या दोघांना मागे टाकण्यासाठी 4 षटकारांची गरज आहे. तसेच टी 20i मध्ये सर्वाधिक षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे.
सूर्याने आतापर्यंत टी 20i कारकीर्दीत 146 षटकार लगावले आहेत. सूर्या या यादीत सातव्या स्थानी आहे. ग्लेन मॅक्सवेल 148 सिक्ससह सहाव्या तर निकोलस पूरन 149 षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे सूर्याला आणि 4 षटकार ठोकून या यादीत पाचव्या स्थानी झेप घेण्याची संधी आहे. सूर्या यासह 150 टी 20i षटकार पूर्ण करणारा रोहितनंतर दुसरा तर पहिला सक्रीय भारतीय फलंदाज ठरेल. रोहितने टी 20i कारकीर्दीत सर्वाधिक 205 षटकार लगावले होते.
सूर्याकडे आशिया कप स्पर्धेतच 4 षटकार ठोकून खास कामगिरी करण्याची संधी आहे. भारतीय संघ आशिया कप स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. तर भारत साखळी फेरीतील आपल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ओमान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना 19 सप्टेंबरला होणार आहे.
सूर्यकुमार यादव याने अवघ्या काही वर्षातच टी 20i संघात स्थान निश्चित करण्यासह कर्णधारपदही मिळवलं. सूर्याने 2021 साली टी 20i पदार्पण केलं. सर्याने तेव्हापासून 83 टी 20i सामन्यांमध्ये 4 शतकं आणि 21 अर्धशतकांच्या मदतीने 2 हजार 598 धावा केल्या आहेत.