IND A vs OMAN : हर्ष दुबेचं नाबाद अर्धशतक, टीम इंडिया सेमी फायनलमध्ये, ओमानचा 6 विकेट्सने धुव्वा

India A vs Oman Match Result : इंडिया ए आणि ओमान या दोन्ही संघांसाठी सेमी फायनलच्या हिशोबाने हा सामना करो या मरो असा होता. मात्र भारताने हा सामना एकतर्फी फरकाने जिंकला आणि उपांत्य फेरीत धडक दिली.

IND A vs OMAN : हर्ष दुबेचं नाबाद अर्धशतक, टीम इंडिया सेमी फायनलमध्ये, ओमानचा 6 विकेट्सने धुव्वा
India A
Image Credit source: acc x account
| Updated on: Nov 19, 2025 | 1:17 AM

जितेश शर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने ओमानवर मात करत एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक दिली आहे. ओमानने इंडिया ए समोर विजयासाठी 136 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताने हे आव्हान 13 बॉलआधी आणि 6 विकेट्सआधी पूर्ण केलं. भारताने 17.5 ओव्हरमध्ये 138 धावा केल्या. हर्ष दुबे हा टीम इंडियाच्या विजयाच्या शिल्पकार ठरला. तसेच इतर फलंदाजांनाही विजयात योगदान दिलं. इंडिया ए आणि ओमान या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना होता. हा सामना जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी होती. मात्र भारताने ओमानचा धुव्वा उडवला. तर ओमानचं पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. तर इंडिया बी ग्रुपमधून पाकिस्ताननंतर सेमी फायलमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरली.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडियाच्या पहिल्या 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या या दोघांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना काही खास करता आलं नाही. वैभव 12 आणि प्रियांश 10 धावा करुन बाद झाले. नमन धीर याने 19 चेंडूत 30 धावा केल्या. नेहल वढेरा याने 23 धावांचं योगदान देत भारताला विजयाच्या आणखी जवळ आणून ठेवलं. तर हर्ष दुबे आणि कॅप्टन जितेश शर्मा या जोडीने भारताला विजयी केलं. जितेशने नाबाद 4 धावा केल्या. तर हर्ष दुबे याने 44 चेंडूत 120.45 च्या स्ट्राईक रेटने 53 रन्स केल्या.

हर्ष दुबे याने या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर ओमानकडून जय ओडेदरा, शफीक जान, समय श्रीवास्तव आणि आर्यन बिष्ट या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा ओमानला काही फायदा झाला नाही.

भारताची सेमी फायनलमध्ये धडक

ओमानला 135 धावांवर रोखलं

त्याआधी भारतीय कर्णधार जितेश शर्मा याने टॉस जिंकला. जितेशने ओमानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ओमानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 135 धावांपर्यंतच मजल मारता आली. ओमानसाठी वसिम अली याने सर्वाधिक 54 धावा केल्या. तर कर्णधार हम्माद मिर्झा याने 32 धावांचं योगदान दिलं. नारायण साईशीव याने 16 तर करण सोनावले याने 12 धावा जोडल्या. भारतासाठी सूयश शर्मा आणि गुरजनप्रीत सिंह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.