
भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सप्टेंबर महिन्यात आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा धुव्वा उडवत सलग दुसर्यांदा आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. त्यानंतर आता 14 नोव्हेंबरपासून एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. या 8 संघात एकूण 15 टी 20 सामने होणार आहेत. स्पर्धेतील अंतिम सामना हा 23 नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेतील 8 संघांना ए आणि बी अशा 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत पोहचतील. त्यानंतर अंतिम सामन्याचा थरार रंगेल आणि विजेता निश्चित होईल.
स्पर्धेतील सहभाग घेतलेल्या एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेत 8 पैकी 3 प्रमुख संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये ओमान, हाँगकाँग आणि यूएईचा समावेश आहे. तर इतर 5 संघांची ए टीम स्पर्धेत खेळणार आहे. या 5 संघांमध्ये भारत ए, पाकिस्तान ए, श्रीलंका ए, बांगलादेश ए आणि अफगाणिस्तान ए चा समावेश आहे.
ए ग्रुपमध्ये हाँगकाँग, बांगलादेश ए, अफगाणिस्तान ए आणि श्रीलंका ए टीम आहेत.
बी ग्रुपमध्ये ओमान, यूएई, पाकिस्तान ए आणि भारत ए संघ आहेत.
आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेतील सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.
आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेतील लाईव्ह सामने मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळतील.
आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेत सलग 6 दिवस दररोज डबल हेडरचा थरार रंगणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेत रोज 2 सामने होतील.
या स्पर्धेत येत्या रविवारी अर्थात 16 नोव्हेंबरला होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. या सामन्यात 2 कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या स्पर्धेत जितेश शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे.