
क्रिकेटच्या प्रकारातील सध्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे टी20 क्रिकेट. दरम्यान आज टी20 क्रिकेटमधील सर्वात मानाचा म्हणजे विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडणार आहे. आजच्या सामन्याची विशेष गोष्ट म्हणजे आज खेळणाऱ्या दोन्ही संघानी एकदाही टी20 विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यातून एक नवा टी20 चॅम्पियन क्रिकेट जगाताला मिळणार आहे.

आतापर्यंतच्या टी20 विश्वचषकांचा विचार करता सर्वाधिक म्हणजेच दोन वेळा वेस्ट इंडिज संघाने ही स्पर्धा जिंकली आहे. सर्वात आधी 2012 आणि नंतर 2016 या साली वेस्ट इंडिजने विश्वचषक जिंकला आहे.

भारतीय संघाचा विचार करता टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हा सर्वात पहिली स्पर्धा भारताने 2007 साली जिंकली होती. यावेळी त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अंतिम सामन्यात मात दिली होती.

भारताकडून पराभूत झाल्यानंतर लगेचच 2009 साली पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्यांनाही एकदाही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदा ते विजयी होतील असे वाटत असताना सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना मात दिली.

यंदाचं टी20 विश्वचषकाचं हे सातवं वर्ष असून वरील संघाशिवाय 2010 साली इंग्लंडने आणि 2014 साली श्रीलंका संघाने ही स्पर्धा जिकंली आहे.