
भारतीय संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्धची 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 अशा फरकाने गमावली. त्यानंतर उभयसंघातील पहिला टी 20I सामना हा पावसामुळे वाया गेला. पहिला टी 20I सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. त्यानंतर दुसरा सामना हा आज 31 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आला. भारताला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने 126 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजयी करण्यात बॉलिंगने प्रमुख भूमिका बजावणारा गोलंदाज उर्वरित टी 20 मालिकेत खेळणार नाहीय. ऑस्ट्रेलियाचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज जोश हेझलवूड याला उर्वरित 3 टी 20I सामन्यांमध्ये इच्छा असूनही खेळता येणार नाही. ऑस्ट्रेलिया टीम मॅनेजमेंटने जोशचा टी 20I मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी संघात समावेश केला होता.
जोशला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र त्यानंतरही जोशला संपूर्ण टी 20I मालिकेसाठी संधी का देण्यात आली नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याबाबत जोशनेच उत्तर दिलंय.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2025 च्या अखेरीस प्रतिष्ठेची एशेस सीरिज खेळवण्यात येणार आहे. या सीरिजसाठी इंग्लंड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर जोशला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे जोशला टी 20I मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांमध्ये संधी देण्यात आली नाही. याबाबत जोशने काय माहिती दिली? जाणून घेऊयात.
“मी आता घरी जात आहे. तसेच मला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये आगामी फर्स्ट क्लास मॅचच्या हिशोबाने सराव करायचा आहे. त्यानंतर आम्ही पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहोत. मला सातत्याने बॉलिंग टाकून सराव करायचा आहे. तसेच रेड बॉलने लय प्राप्त करायची आहे”, असं हेझलवूडने म्हटलं.
दरम्यान पहिला सामन्यात पावसामुळे 9.4 ओव्हरनंतर खेळ झाला नाही. जोशने पहिल्या सामन्यात 3 ओव्हर बॉलिंग केली. मात्र त्याला विकेट मिळाली नाही. मात्र जोश हेझलवूड याने दुसर्या सामन्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेत भारताला 125 रन्सवर ऑलआऊट करण्यात प्रमुख भूमिका बजावली.