ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने पराभवाचं कारण भलतंच सांगितलं, पुढे मोठी मालिका असल्याने….

भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारताकडे पाचवा टी20 सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. पण ऑस्ट्रेलियाला ही मालिका बरोबरीत सोडवण्याशिवाय पर्याय नाही. या सामन्यानंतर कर्णधार मिचेल मार्शने पराभवाचं विश्लेषण केलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने पराभवाचं कारण भलतंच सांगितलं, पुढे मोठी मालिका असल्याने....
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने पराभवाचं कारण भलतंच सांगितलं, पुढे मोठी मालिका असल्याने....
Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Nov 06, 2025 | 6:21 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा टी20 सामना क्वीन्सलँडरच्या कॅररा ओव्हल मैदानात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. भारताने या सामन्यात 20 षटकात 8 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 119 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने 18.2 षटकात सर्व गडी गमावले आणि भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला. खरं तर हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. कारण मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या मालिकेचा निकाल चार सामन्यात लागणार आहे. चार पैकी तीन सामने जिंकणाऱ्या संघाच्या खिशात ही मालिका जाणार आहे. आता ही संधी भारताकडे आली आहे. कारण भारताने दुसरा सामना गमावल्यानंतर कमबॅक केलं आणि तिसऱ्या-चौथ्या सामन्यात विजय मिळवला. या मालिकेत भारताकडे 2-1 ने आघाडी आहे.

भारताने चौथ्या सामन्यात पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने भलतंच कारण सांगितलं आहे. आमच्याकडे ताकदीचे खेळाडू नव्हते असा कांगावा केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एशेज मालिकेसाठी काही खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे. तीच री ओढत कर्णधार मिचेल मार्शने पराभवाचं विश्लेषण केलं. कर्णधार मिचेल मार्श म्हणाला की, ‘मला वाटले की या विकेटवर सुमारे 167 धावा गाठणं सहज शक्य होतं. पण फलंदाजीत आमच्यापुढे काही आव्हाने आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला फक्त दोन भागीदारींची आवश्यकता होती आणि आम्ही ती करू शकलो नाही. भारत संघ जागतिक दर्जाचा आहे. विशेषतः या परिस्थितीत. त्यामुळे प्रत्येक सामन्यात तुमचा पूर्ण ताकदीचा संघ पाहीजे. परंतु काही खेळाडूंकडे पुढची मालिका आहे. आम्हाला विश्वचषकापर्यंत खेळाडूंना संधी देणे गरजेचं आहे. उच्च दबाव असलेल्या अशा सामन्यांमध्ये खेळाडूंना अधिक संधी मिळतात, मला वाटते की ते खूप छान आहे.’

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा सामना 8 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना मालिकेचा निकाल देणार आहे. एक तर मालिका बरोबरीत सुटेल किंवा भारत जिंकेल अशी स्थिती आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर दबाव असणार आहे. त्यांना काही करून शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. पाचवा टी20 सामना गाबामध्ये होणार आहे. भारतीय संघाकडे पुन्हा एकदा इतिहास रचण्याची संधी आहे.