Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेतून बाबरचा संघ बाहेर, तिसऱ्याच दिवशी पत्ता कट

Asia Cup 2025 : टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिलंवहिलं शतक लगावणाऱ्या फलंदाजाचा संघ 17 व्या आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जाणून घ्या ती टीम कोणती आहे.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेतून बाबरचा संघ बाहेर, तिसऱ्याच दिवशी पत्ता कट
Asia Cup 2025 Trophy
Image Credit source: ACC X Account
| Updated on: Sep 12, 2025 | 8:59 PM

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी आहेत. या 8 संघांची 4-4 नुसार 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. ए ग्रुपमध्ये गतविजेता टीम इंडिया, पाकिस्तान, होम टीम यूएई आणि डेब्यूटंट ओमान क्रिकेट संघाचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग असे 4 संघ आहेत. टीम इंडिया गतविजेता आहे. त्यामुळे टीम इंडियाच प्रबळ दावेदार समजली जात आहे. तसेच टीम इंडियासमोर आशिया कपचं विजेतेपद राखण्याचं आव्हान आहे. आशिया कप स्पर्धेला सुरुवात काहीच दिवस झालीय. इतक्यातच पहिला संघ या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

बाबर हयात याच्या हाँगकाँग क्रिकेट टीमचं आशिया कप स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलं आहे. हाँगकाँग बी ग्रुपमध्ये आहे. हाँगकाँग 17 व्या आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. आशिया कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत एका संघाला प्रत्येकी 3-3 सामने खेळायचे आहेत. हाँगकाँगने आतापर्यंत (11 सप्टेंबर) सर्वाधिक 2 सामने खेळले आहेत. हाँगकाँगला या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. हाँगकाँगचं 11 सप्टेंबरला बांगलादेश विरूद्धच्या पराभवानंतर स्पर्धेतून पॅकअप झालं. हाँगकाँगला दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. हाँगकाँग या स्पर्धेतून बाहेर झाल्याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सलग 2 पराभवांमुळे हाँगकाँग सुपर 4 मध्ये पोहचू शकत नाही. हाँगकाँगची सुपर 4 मध्ये पोहचण्याची कणभरही शक्यता नाही.

हाँगकाँगची पराभवाने सुरुवात

आशिया कप 2025 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 9 सप्टेंबरला हाँगकाँगसमोर अफगाणिस्तानचं आव्हान होतं. अफगाणिस्तानने हा सामना एकतर्फी फरकाने जिंकला. हाँगकाँगला अफगाणिस्तान विरुद्ध 189 धावांचा पाठलाग करताना 100 पार मजल मारता आली नाही. अफगाणिस्तानने हाँगकाँगला 94 धावांवर गुंडाळलं आणि विजय मिळवला.

अफगाणिस्ताननंतर बांगलादेशकडून मात

हाँगकाँग अफगाणिस्तानंतर या स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध मैदानात उतरली. उभयसंघात 11 सप्टेंबरला सामना खेळवण्यात आला. हाँगकाँगने 2014 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशवर विजय मिळवला होता. तसेच पराभवाने सुरुवात झाल्याने हाँगकाँगसाठी बांगलादेश विरुद्धचा सामना करो या मरो असा होता. त्यामुळे हाँगकाँग बांगलादेश विरुद्ध मात करत स्पर्धेतील आव्हान कायम राखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र बांगलादेशने 7 विकेट्सने विजय मिळवत हाँगकाँगच्या पराभवाची परतफेड केली.

हाँगकाँगचा पराभवासह पत्ता कट

हाँगकाँगचा शेवटचा सामना केव्हा?

दरम्यान हाँगकाँगचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना 15 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. हाँगकाँगसमोर या सामन्यात श्रीलंकेचं आव्हान असणार आहे.