
टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला स्वसतात गुंडाळलं आहे. बांगलादेशला भारतीय गोलंदाजांसमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने बांगलादेशला 49.4 ओव्हरमध्ये 228 धावांवर गुंडाळलं. तॉहिद हृदॉय याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात 220 पार पोहचता आलं. त्यामुळे भारताला विजयासाठी 229 धावांचं आव्हान मिळालं आहे. बांगलादेशला 230 धावांच्या आत रोखण्यात मोहम्मद शमीने निर्णायक भूमिका बजावली. शमीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर इतरांनीही चांगली साथ दिली. आता गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडल्यानंतर भारतीय फलंदाजांवर जबाबदारी असणार आहे.
बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला झटपट 5 धक्के देत फलंदाजांची हवा टाईट केली. सौम्य सरकार, कॅप्टन नजमूल हुसैन शांतो आणि मुशफिकर रहीम या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर मेहदी हसन मिराजने 5 आणि तांझिद हसन याने 25 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे बांगलादेशची 5 बाद 35 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर तॉहिद हृदाय आणि जाकेर अली या दोघांनी सहाव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली आणि बांगलादेशची लाज राखली.
तॉहिद आणि जाकेर या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी केली. मोहम्मद शमीने ही जोडी फोडली. शमीने जाकेरला विराट कोहलीच्या हाती कॅच आऊट केलं. जाकेरने 114 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. त्यानंतर टीम इंडियाने झटपट धक्के देत बांगलादेशला ऑलआऊट केलं.
बांगलादेशसाठी तॉहिदने सर्वाधिक धावा केल्या. तॉहिदने 118 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 100 धावा केल्या. तॉहिदचं हे त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं. तर रिशाद हौसेन याने 18 धावांचं योगदान दिलं. भारताकडून मोहम्मद शमीने 53 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने तिघांना आऊट केलं. तर अक्षर पटेल याने दोघांना बाद केलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.