Test Cricket : आशियात दशकानंतर कसोटी विजय, बांगलादेशला घरात लोळवलं

Test Cricket : ढाका येथे उभयसंघात पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान बांगलादेशला चौथ्याच दिवशी पाहुण्या संघांकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. पाहुण्या संघाने यासह आशियात तब्बल 10 वर्षांनी कसोटी सामना जिंकला आहे.

Test Cricket : आशियात दशकानंतर कसोटी विजय, बांगलादेशला घरात लोळवलं
bangladesh cricket team
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 24, 2024 | 12:48 PM

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत विजयी सलामी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयाने सुरुवात करत यजमानांना बॅकफुटवर ढकललं आहे. ढाका येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर 7 विकेट्सने मात केली. दक्षिण आफ्रिकेसाठी हा विजय खास ठरला. दक्षिण आफ्रिकेने आशियात तब्बल 10 वर्षांनी कसोटी सामना जिंकण्याची कामगिरी करून दाखवली आहे. दक्षिण आफ्रिकेची यासह आशियात कसोटी विजयाची प्रतिक्षा अखेर संपली. दक्षिण आफ्रिकेला गेल्या 9 सामन्यांमध्ये आशियात पराभूत व्हावं लागलेलं. मात्र दक्षिण आफ्रिकेने ही पराभवाची साखळी तोडली आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला त्यांच्याच घरात तब्बल 16 वर्षांनंतर पराभूत केलं आहे. दक्षिण आफ्रिकेने याआधी बांगलादेशला त्यांच्यात घरात 2008 साली पराभूत केलं होतं.

सामन्यात काय काय झालं?

बांगलादेश कॅप्टन नजमुल शांतो याने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 106 धावांवर आटोपला. महमुदुल हसन जॉय याने सर्वाधिक 30 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकालाही दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. तर दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडा, वियान मुल्डर आणि केशव महाराज या त्रिकुटाने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 308 धावा करत 202 धावांची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेसाठी कायले वेरेनी याने शतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिका अडचणीत असताना कायलेने निर्णायक भूमिका बजावली. कायलेने दक्षिण आफ्रिकेची 6 बाद 108 अशी स्थितीत असताना ही शतकी खेळी केली. बांगलादेशने दुसर्‍या डावात प्रत्युत्तरात 207 धावांपर्यंत मजल मारली. तर दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचं आव्हान मिळालं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं.

दक्षिण आफ्रिकेची विजयी सुरुवात

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, झाकेर अली, नईम हसन, तैजुल इस्लाम आणि हसन महमूद.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, रायन रिकेल्टन, मॅथ्यू ब्रेट्झके, कायले वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि डेन पिएड.