BAN vs WI : काय म्हणावं या प्रकाराला? विंडीजचा बांगलादेश विरुद्ध असा प्रयोग, 50 ओव्हर..
Bangladesh vs West Indies 2nd ODI : वेस्ट इंडिजने ढाक्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश विरुद्ध पूर्ण 50 ओव्हर फिरकी गोलंदाजांकडून बॉलिंग करुन घेतली. विंडीजच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. बांगलादेशने 18 ऑक्टोबरला पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिला सामना गमावल्याने विंडीजसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे. दुसरा सामना हा ढाक्यातील शेरे ए बांगला स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. वेस्ट इंडिजने या सामन्यात बांगलादेश विरुद्ध केलेल्या एका प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विंडीजने या सामन्यात पूर्ण 50 ओव्हर फिरकी बॉलिंग केली. अर्थात विंडीजने या सामन्यात वेगवान गोलंदाजांकडून एकही ओव्हर बॉलिंग करुन घेतली नाही. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात फिरकीपटूंकडूनच संपूर्ण ओव्हर करुन घेण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी.
बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. तर विंडीजने खेळपट्टी पाहता फिरकी गोलंदाजांवर विश्वास दाखवला. विंडीजने पहिलीच ओव्हर फिरकी गोलंदाजाला टाकायला दिली. त्यानंतर पाहता पाहता संपूर्ण 50 ओव्हर फिरकीपटूंनीच बॉलिंग केली. विंडीजच्या 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 10-10 ओव्हर बॉलिंग केली. विंडीज अशाप्रकारे वनडे क्रिकेटमध्ये संपूर्ण 50 ओव्हर स्पिनरकडून बॉलिंग करुन घेणारी पहिलीच टीम ठरली.
विंडीजकडून श्रीलंकेचा रेकॉर्ड ब्रेक
विंडीजने यासह श्रीलंकेचा रेकॉर्ड ब्रेक केला. श्रीलंकेने एकदिवसीय सामन्यांत एकूण 3 वेळा 44 षटकं फिरकी गोलंदाजांकडून करुन घेतली होती. श्रीलंकेने 1996 साली विंडीज, 1998 साली न्यूझीलंड आणि 2004 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध फिरकीपटूंकडून 44 ओव्हर बॉलिंग करुन घेतली होती.
विंडीजचा या सामन्यात फिरकीपटूंकडून 50 ओव्हर करुन घेण्याचा निर्णय योग्यही ठरला. बांगलादेशला घरात विंडीज विरुद्ध 220 धावाही करता आल्या नाहीत. विंडीजने बांगलादेशला 213 धावांवर रोखलं. विंडीजच्या फिरकीपटूंनी एकूण 7 विकेट्स घेतल्या.
गुडाकेश मोतीला सर्वाधिक विकेट्स
विंडीजसाठी अकील हुसैन, रोस्टन चेज, एलिक अथानजे, गुडाकेश मोती आणि खारी पियरे या 5 जणांनी बॉलिंग केली. विंडीजसाठी गुडाकेशने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. गुडाकेशने बांगलादेशच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर एलिक अथानजे आणि अकील हुसैन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तसेच चेज आणि पियरे या दोघांना विकेट मिळाली नाही. मात्र या दोघांनी चिवट बॉलिंग केली.
विंडीज मालिकेत बरोबरी साधणार?
दरम्यान आता गोलंदाजांनंतर विंडीजचे फलंदाज 214 धावांचं आव्हान पूर्ण करत 1-1 ने बरोबरी करण्यात यशस्वी ठरणार की बांगलादेश सलग दुसर्या विजयासह मालिका नावावर करणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
