
क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशात आता लीग स्पर्धा खेळवल्या जात आहे.यात बांग्लादेश क्रिकेट बोर्डही मागे नाही. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या माध्यमातून बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन केलं जातं. पण या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. कारण या स्पर्धेच्या 24 तासाआधी एका फ्रेंचायझीने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. चटोग्राम रॉयल्स या फ्रेंचायझीचे मालकी हक्क ट्रायगंल सर्व्हिसेस लिमिटेडकडे होते. पण आता हे हक्क बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडे गेल्याची माहिती आहे. फ्रेंचायझीचे मालकांनी स्पर्धेचं 12वं पर्व सुरू होण्यापू्र्वीच या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. प्रायोजकांची उणीव असल्याने ट्रायंगल सर्व्हिसेस लिमिटेडने मालिकी हक्क सोडला. ही स्पर्धा 26 डिसेंबरपासून सुरु होणार असून वेळापत्रकही समोर आलं आहे. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची धावाधाव सुरु झाली आहे.
ईएसपीएनक्रिकइंफोच्या मते, बीपीएलचे चेअरमन इफ्तेखार रहमान यांनी सांगितलं की, ‘त्यांनी तीन तासांपूर्वीच बीसीबीला पत्र दिलं आहे. यासाठी आम्ही अधिकृतपणे संघाचा ताबा घेतला आहे. असं काही होईल कोणालाच माहिती नव्हतं. फ्रेंचायझीने पत्र लिहित स्पष्ट केलं की, मिडिया रिपोर्टमुळे त्यांच्या संघाला कोणीही प्रायोजक मिळत नाही. या पर्वात आम्ही प्रामाणिकपणे आणि खेळाडूंना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. आम्हाला मागच्या वर्षी घडलेला राजशाही फ्रेंचायझीसारखा प्रकार नको.’ दरम्यान, माजी क्रिकेटपटू हबीबुल बशर याची चट्टोग्राम संघाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मिजानुर रहमान बाबुल यांची मुख्य प्रशिक्षक आणि नफीस इक्बाल यांची संघ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बांग्लादेश प्रीमियर लीग अर्थात बीपीएल 2012 मध्ये सुरु झाली. सुरुवातीच्या पर्वात खेळाडूंना मोबदल देण्यात काही अडचणी आल्या. त्यानंतर 2016 पासून 2019 पर्यंत बऱ्याच सुधारणा झाल्या. मागच्या पर्वात पुन्हा एकदा अडचणींचा डोंगर उभा राहिला. त्यात दरबार राजशाही फ्रेंचायझीच्या खेळाडूंनी बंड पुकारलं होतं. दैनिक भत्ता तसेच हॉटेल बिल भरलं जात नसल्याने सराव आणि एका सामन्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सरकारला या प्रकरणात उडी घ्यावी लागली होती.