
आयपीएल 2025 दरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. बीसीसीआयने या वार्षिक करारात एकूण 34 खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच अनेक खेळाडूंना या वार्षिक करारात संधी मिळाली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू असणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने वार्षिक करारातील 34 खेळाडूंची 4 श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. त्यानुसार बीसीसीआयकडून खेळाडूंना श्रेणीनुसार वार्षिक रक्कम मिळणार आहे. ए प्लस, ए, बी आणि सी या 4 श्रेणींमध्ये खेळाडूंची विभागणी केली आहे. त्यानुसार ए प्लस ग्रेड असलेल्या खेळाडूंना सर्वाधिक 7 कोटी रुपये दिले जातात. तर ए, बी आणि सी या 3 श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे 5, 3 आणि 1 कोटी रुपये दिले जातात. त्या व्यतिरिक्त खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी मानधन दिलं जातं.
बीसीसीआयने ए प्लस या श्रेणीत सर्वात कमी 4 खेळाडूंचा समावेश केला आहे. टी 20i, वनडे आणि टेस्ट या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्यांचा या ए प्लस ग्रेडमध्ये समावेश केला जातो. टीम इंडियाच्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी 20i वर्ल्ड कप 2024 नंतर सर्वात छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र त्यानंतरही बीसीसीआयने या तिघांचा ए प्लस मध्ये समावेश केला आहे. तसेच या तिघांव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह यालाही कायम ठेवलं आहे.
बीसीसीआयने अ गटात एकूण 6 खेळाडूंना समाविष्ट केलं आहे. या 6 खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंतचा समावेश आहे.
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर हे दोघे वार्षिक करारात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. या दोघांना गेल्या वेळेस वगळण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर या दोघांना आता संधी मिळाली आहे. श्रेयससह एकूण 5 खेळाडूंचा बी ग्रुपमध्ये समावेश आहे. यामध्ये टी 20i संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे.
आयपीएल 2025 दरम्यान वार्षिक कराराची घोषणा
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
BCCI announces annual player retainership 2024-25 – Team India (Senior Men)#TeamIndia
Details 🔽https://t.co/lMjl2Ici3P pic.twitter.com/CsJHaLSeho
— BCCI (@BCCI) April 21, 2025
बीसीसीआयने सी ग्रेडमध्ये सर्वाधिक 19 खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. या 19 खेळाडूंमध्ये ईशान किशन, रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आला आहे.