Boria Majumdar ban: ऋद्धिमान साहाला धमकावणाऱ्या पत्रकारावर BCCI ची मोठी कारवाई

| Updated on: May 04, 2022 | 5:38 PM

Boria Majumdar ban: या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीसीसीआयने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीने या प्रकरणात मजुमदार यांना दोषी ठरवले होते.

Boria Majumdar ban: ऋद्धिमान साहाला धमकावणाऱ्या पत्रकारावर BCCI ची मोठी कारवाई
साहाला धमकी देणाऱ्या बोरिया मुझुमदारवर दोन वर्षांची बंदी
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: BCCI ने क्रिकेट इतिहासकार, पत्रकार आणि बायोग्राफी रायटर बोरिया मजुमदार यांच्यावर दोन वर्ष बंदीची कारवाई केली आहे. मजुमदार यांच्यावर विकेटकीपर फलंदाज ऋद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) मुलाखतीसाठी धमकावल्याचा आरोप आहे. बोरिया मजुमदार (Boria Majumdar) यांना पुढची दोन वर्ष देशातील कुठल्याही क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही तसेच भारतातील कुठल्याही सामन्यासाठी प्रेस एक्रीडिटेशनही मिळणार नाही. म्हणजेच मजुमदार यांनी भारतीय संघाच्या कुठल्याही पत्रकार परिषदेला उपस्थित राहता येणार नाही. भारतातील कुठल्याही क्रिकेट सुविधेचा त्यांना वापर करता येणार नाही, तसेच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील क्रिकेटपटुंच्या मुलाखतीही मिळणार नाहीत. BCCI एवढ्यावरच थांबणार नाही, तर ते आयसीसीकडे तक्रार करणार आहेत. जगात जिथे कुठे आयसीसीच्या स्पर्धा होतील, तिथे त्यांच्यावर बंदी घालण्यात येईल.

BCCI नेमली होती त्रिसदस्यीय समिती

या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीसीसीआयने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीने या प्रकरणात मजुमदार यांना दोषी ठरवले होते. साहाला भारताच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर मजुमदार यांना या विषयावर त्याच्याशी बोलायचे होते. परंतु सहाने नकार दिल्याने ते संतापले. त्यांनी सहाला मुलाखत देत नसल्याने धमकावले. “तुम्ही फोन केला नाही. मी तुमची यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही. मला अपमान सहन होत नाही आणि मला ते लक्षात राहील. तुम्ही असे करायला नको होते” असे बोरिया मजुमदारने सहाला म्हटलं होतं.

साहाने ट्विटरवर स्क्रीनशॉट पोस्ट केले होते

या संभाषणाचे स्क्रीनशॉट साहाने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. यानंतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी साहाला पाठिंबा देत बीसीसीआयकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती.

सहाची मुलाखत का हवी होती?

श्रीलंकेविरुद्धच्या T20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने 19 फेब्रुवारीला केली होती. मात्र अनुभवी यष्टिरक्षक ऋद्धिमान साहाला त्यात स्थान मिळाले नाही. यानंतर एका पत्रकाराने साहा यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून मुलाखतीची मागणी केली. ज्याला साहा यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पत्रकाराकडून त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत साहाने नाराजी व्यक्त केली होती.