
क्रिकेट विश्वातून भारतासाठी या क्षणाची मोठी आणि अभिनास्पद बातमी आली आहे. बीसीसीआय सचिव आणि एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यासाठी 27 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. मात्र जय शाह यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही अर्ज केला नाही. त्यामुळे जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. जय शाह 1 डिसेंबर 2024 रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. जय शाह यासह आयसीसी अध्यक्षपदी निवड होणारे एकूण पाचवे तर पहिले सर्वात युवा भारतीय ठरले आहेत. जय शाह यांना वयाच्या 35 वर्षी ही जबाबदारी मिळाली आहे.
ग्रेग बार्कले हे आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. बार्कले यांची ही अध्यक्षपदाची दुसरी टर्म आहे. त्यांचा कार्यकाळ हा 30 नोव्हेंबरला संपणार आहे. मात्र त्यांनी तिसऱ्या टर्मबाबत नकार दिला. त्यामुळे अध्यक्षपदासाठी अर्ज मागवण्यात आले. आता आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची आजचा (27 ऑगस्ट) शेवटची तारीख होती. मात्र जय शाह यांच्या व्यतिरिक्त कुणीही अर्ज केला नाही. त्यामुळे आता जय शाह हे आयसीसीचे बॉस असणार आहेत. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
जय शाह यांच्या प्रगतीचा चढता आलेख राहिला आहे. जय शाह यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनमधून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर जय शाह यांची 2019 साली पहिल्यांचा बीसीसीआयच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2 वर्षांनी जय शाह यांना आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर आता ते काही महिन्यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज आहेत.
आयसीसी अध्यक्षपदी जय शाह
Jay Shah has been elected unopposed as the next Independent Chair of the ICC.https://t.co/Len6DO9xlE
— ICC (@ICC) August 27, 2024
जय शाह यांनी याआधी गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये आपल्या भूमिकेला न्याय दिला. तर ते सध्या बीसीसीआय सचिव आणि एसीसी अध्यक्षपदाची सार्थपणे जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनी देशातंर्गत क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. तसेच आमूलाग्र बदलही केलेत. आता आयसीसीमध्ये एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेटला आणखी सुगीचे दिवस येतील, हे देखील स्पष्ट झालं आहे.