
टी 20I आशिया कप 2025 स्पर्धेची सांगता रविवारी 28 सप्टेंबरला झाली. भारताने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवून नवव्यांदा आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. अंतिम सामना होऊन अनेक दिवस लोटले आहेत. मात्र त्यानंतरही वाद अजूनही कायम आहे. पहलगाम दहशतावादी हल्ल्यानंतरही क्रीडा मंत्रालयाने टीम इंडियाला आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास परवानगी दिली. मात्र भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसह तिन्ही सामन्यात हस्तांदोलन टाळलं. तसेच अंतिम सामन्यानंतर एसीसी आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यात हस्ते आशिया कप ट्रॉफी घेणार नसल्याचं टीम इंडियाकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार भारताने नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वींनी ही ट्रॉफी आपल्याकडेच ठेवली. त्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद पाहायला मिळतोय.
भारताने नक्वींच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वींनी ट्रॉफी आपल्याकडे ठेवली. नक्वींना ट्रॉफी आपल्याकडे ठेवण्याची कृती चांगलीच भोवणार असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयमुळे नक्वींना पद सोडवं लागू शकतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नक्वी यांना एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदावरुन हटवावं, अशी मागणी बीसीसीआयची आहे. त्यामुळे आता नक्वींचा काय फैसला केला जातो? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
काही दिवसांपूर्वी एसीसीची बैठक पार पडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारताला आशिया कप ट्रॉफी सोपवण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र हा विषय अजेंड्यात नसल्याचं म्हणत नक्वींनी ट्रॉफी देण्यास नकार दिला.
पाकिस्तानमधील आऊलेट द ओपिनियनच्या वृत्तानुसार, आशिया कप 2025 ट्रॉफी वाद प्रकरणात बीसीसीआय नक्वी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय नक्वींना हटवण्यासाठी इतर सदस्यांना तयार करुन बहुमताची जुळवाजुळव करत आहे. याबाबतीत श्रीलंकेचा भारताला पाठींबा असल्याचं म्हटलं जात आहे. तर बांगलादेश पाकिस्तानच्या बाजूने असल्याची चर्चा आहे.
तसेच बीसीसीआय आणि भारतीय आजी माजी खेळाडूंनी अफगाणिस्तान क्रिकेट टीमला क्रिकेटबाबत फार मदत केली आहे. अफगाणिस्तान आता मदतीची जाणिव ठेवून पाठींबा देणार का? याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय बहुमत मिळवण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.