मोहम्मद शमीचं जोरदार कमबॅक, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात निम्मा संघ गारद करत नोंदवला विक्रम

वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीला तशी धार आहे की नाही याबाबत शंका होती. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत काही खास करू शकला नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत काय करेल याबाबत साशंकता होती. पण मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीला पुन्हा एकदा धार आल्याचं दाखवून दिलं आहे.

मोहम्मद शमीचं जोरदार कमबॅक, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात निम्मा संघ गारद करत नोंदवला विक्रम
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 20, 2025 | 7:03 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीतील बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शमीला संघात स्थान दिलं. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत त्याने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं होतं. पण त्यानंतर दुखापतीमुळे एक वर्ष मैदानाबाहेर होता. तसेच इंग्लंड विरूद्धच्या मालिकेतून कमबॅक केलं. पण त्या मालिकेत काही खास करू शकला नाही. पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीला धार असल्याचं दाखवून दिलं आहे. मोहम्मद शमीने आपल्या भेदक गोलंदाजीने बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत पाठवला. मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2013 साली डेब्यू केलं होतं. पण 12 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात होता मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. पण यावेळी मुख्य गोलंदाज म्हणून त्याला संघात स्थान मिळालं आहे.

मोहम्मद शमीने पहिल्या षटकात बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं. पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर सौम्य सरकारची विकेट काढली. त्यानंतर सातव्या षटकात शमीने मेहदी हसन मिराजला तंबूत पाठवला. मैदानात जाकेर अली आणि तौहिद हृदयोय यांची शतकी भागिदारी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरली होती. तेव्हा ही जोडी फोडण्याचं काम रोहितने शमीकडे सोपवलं. मोहम्मद शमीने जाकेर अलीची विकेट काढली आणि वनडे क्रिकेटमध्ये 200 धावांचा पल्ला गाठकला. तसेच त्यानंतर तंजीम हसन साकिब आणि तस्किन अहमदची विकेट काढून पाच विकेटही पूर्ण केल्या.

मोहम्मद शमीच्या वनडे क्रिकेट कारकिर्दितील हा 104 वा वनडे सामना आहे. वनडे करिअरमध्ये त्याने सहाव्यांदा पाच विकेट घेण्याची किमया साधली आहे. पण यातही खास बाब म्हणजे, शमीने पाच वेळा पाच विकेटचा मान आयसीसी स्पर्धेत मिळवला आहे. आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक वेळा पाच विकेट घेणारा शमी पहिला गोलंदाज आहे. इतकंच काय तर आयसीसी स्पर्धेतील 19 सामन्यात 60 विकेट घेत झहीर खानचा विक्रमही मोडला आहे. झहीर खानच्या नावावर 59 विकेट आहेत.