
रविवारी 9 मार्चला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या महाअंतिम सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने या स्पर्धेतील साखळी फेरीतील 3 आणि उपांत्य फेरी असे एकूण 4 सामने जिंकले आहेत. तसेच टीम इंडियाने न्यूझीलंडवर साखळी फेरीत विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने साखळी फेरीत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेवर मात करत अंतिम फेरीत धडक दिली आहे.
मिचेल सँटनर हा न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व असणार आहे. महाअंतिम सामना असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांना रोहितसह अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात किती धावा केल्या आहेत? हे या निमित्ताने जाणून घेऊयात.
विराट आतापर्यंत वनडे वर्ल्ड कप, टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळला आहे. विराट आयसीसी स्पर्धेतील एकूण 6 अंतिम सामने खेळला आहे. विराटने या 6 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांच्या मदतीने 290 धावा केल्या आहेत.
रोहितही विराट प्रमाणे आयसीसी स्पर्धेतील एकूण 6 अंतिम सामने खेळला आहे. मात्र रोहितला विराटच्या तुलनेत निम्म्या धावाही करता आल्या नाहीत. रोहितने 6 सामन्यांमध्ये 124 धावा केल्या आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.