
भारत आणि बांग्लादेश यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात विजय मिळवताच उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होणार आहे. नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो म्हणाला की, ‘आम्हाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. खेळपट्टी चांगली दिसतेय म्हणून आम्हाला धावा फलकावर लावायच्या आहेत. आज आम्ही चांगले क्रिकेट खेळू आणि खेळाडू आत्मविश्वासू आहेत. आमच्याकडे तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकी गोलंदाज आहेत.’ खरं तर हा निर्णय कर्णधार रोहित शर्माच्या मनासारखा झाला होता. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘मी आधी क्षेत्ररक्षण केले असते. आम्ही काही वर्षांपूर्वी इथे खेळलो होतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे की चेंडू प्रकाशात चांगला येतो. सगळे चांगले दिसत आहेत. सगळेच तंदुरुस्त आहेत आणि खेळण्यासाठी तयार आहेत. आशा करूया की आपण चांगली सुरुवात करू. मागे वळून पाहण्याची गरज नाही, या स्पर्धेत प्रत्येक सामना खूप महत्त्वाचा आहे. आम्ही खेळलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील फक्त वरुणलाच संधी मिळाली नाही. जडेजा परत आला आणि अर्शदीपला ऐवजी शमी परतला.’
टीम इंडियाने अवघ्या 35 धावांवर बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत पाठवला आहे. त्यामुळे बांगलादेशवर मोठ्या धावसंख्येचं दडपण आहे. त्यात पाटा विकेट असल्याने चेंडू आरामात बॅटवर येईल असं पिच रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं आहे. त्यामुळे 300 च्या आसपासही स्कोअर गाठू शकतो अशी स्थिती आहे. पण बांगलादेशच्या निम्म्या संघाने आधीच नांगी टाकली आहे. पण टीम इंडियाच्या चाहत्यांना एक वेगळीच चिंता सतावत आहे. ती म्हणजे कर्णधार रोहित शर्माचं वारंवार नाणेफेक गमावणं. रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2023 नंतर सलग 11 व्यांदा नाणेफेक गमावली आहे. रोहित शर्माने शेवटची नाणेफेक वनडे वर्ल्डकप 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध जिंकला होता.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल गमवताच आंतरराष्टीय पातळीवर एका विक्रमाची बरोबरी केली आहे. नेदरलँडने सलग 11 वेळा नाणेफेकीचा कौल गमावला आहे. त्यानंतर आता भारतीय संघाने या रेकॉर्डची बरोबरी साधली आहे. नेदरलँडने मार्च 2011 ते ऑगस्ट 2013 या कालावधीत 11 वेळा नाणेफेक गमावली आहे. भारताचा नाणेफेक गमवण्याची प्रक्रिया वनडे वर्ल्डकप 2023 अंतिम सामन्यापासून सुरु झाली आहे. तेव्हा ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि टीम इंडियाला पराभूत केलं होतं.