
आयपीएलच्या इतिहासात तीन वेळा विजयी खिताब पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्सने यंदाही अप्रतिम कामिगिरी करत सर्वप्रथम प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. दरम्यान त्यांनी 11 पैकी 9 सामने जिंकले असून यामागे त्यांचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचं मोठं योगदान आहे. ऋतुराज यंदाच्या पर्वात सातत्याने अप्रतिम कामगिरी करत आहे.

विशेष म्हणजे चेन्नईने यूएईमध्ये आयपीएल सुरु झाल्यापासून 4 पैकी 4 ही सामने जिंकले आहेत. यामध्ये सर्वाधिक धावा ऋतुराजच्या बॅटमधूनच निघाल्या आहेत. त्याने 4 डावात 70 च्या सरासराने 211 धावा केल्या आहेत. दुसऱ्या पर्वात या सर्वाधिक धावा असून ऋतुराजनंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचा नंबर लागतो. त्याने आतापर्यंत 175 धावा केल्या आहेत.

सर्वाधिक धावा करण्यासोबतच सर्वाधिक षटकारही ऋतुराजने लगावले आहेत. ऋतुराजने 4 डावांत सर्वाधिक 10 षटकार खेचले आहेत. त्याच्या पानंतर जेसन होल्डर, महिपाल लोमरोर आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी 6 षटकार ठोकले आहेत.

विशेष म्हणजे षटकारांसोबत चौकार लगावण्यातही ऋतुुराजचं पुढे आहे. त्याने दिग्गजांना मागे टाकत 19 चौकार लगावले आहेत.

ऋतुराजसाठी यंदाची आयपीएल अप्रतिम चालली असून त्याने या संपूर्ण सीजनमध्ये 11 सामन्यांत 407 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. दरम्यान ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत तो पाचव्या स्थानावर आहे.