IPL 2027: CSK आणि SRH मध्ये राडा! 4 खेळाडूंची अदलाबदल, ‘हा’ एकमेव भारतीय खेळाडू थेट हैदराबादला?

आयपीएल 2027 च्या मिनी लिलावाआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी मोठा व्यवहार केला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 खेळाडूंची अदलाबदल केली असून या चार जणांमध्ये एकमेव भारतीय खेळाडू कोण आहे? जाणून घ्या संपूर्ण ट्रेड डील आणि खेळाडूंची किंमत.

IPL 2027: CSK आणि SRH मध्ये राडा! 4 खेळाडूंची अदलाबदल, हा एकमेव भारतीय खेळाडू थेट हैदराबादला?
IPL Auction 2027
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 3:55 PM

आयपीएल 2027 च्या मिनी लिलावाचे वेध लागलेले असतानाच, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या दोन मातब्बर संघांमध्ये एक मोठा ट्रेड व्यवहार पूर्ण झाला आहे. आगामी हंगामाआधी दोन्ही फ्रँचायझींनी प्रत्येकी 2, अशा एकूण 4 खेळाडूंची अदलाबदल करत क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. 5 नोव्हेंबर रोजी आयपीएल प्रशासनाने या ट्रेडवर अधिकृत शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, या संपूर्ण देवाणघेवाणीत केवळ एकाच भारतीय खेळाडूचा समावेश असून, उर्वरित तिघे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे तगडे आंतरराष्ट्रीय स्टार आहेत.

चेन्नईच्या ताफ्यात दोन अष्टपैलूंचा धमाका

चेन्नईने आपल्या संघात मधल्या फळीतील आक्रमक फलंदाजी आणि फिरकीचा पर्याय देणारा इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन याला समाविष्ट केले आहे. हैदराबादने तब्बल 13 कोटींना खरेदी केलेल्या लिव्हिंगस्टोनला आता 6 कोटींच्या सुधारित किमतीत चेन्नईकडून खेळावे लागणार आहे. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू जॅक एडवर्ड्स 3 कोटींच्या मूळ किमतीत CSK मध्ये दाखल झाला आहे. दुखापतीमुळे एडवर्ड्स 2026 चा संपूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता.

Loading...

खलील अहमदची ‘घरवापसी’ अन् नॅथन एलिसची साथ

दुसऱ्या बाजूला, सनरायझर्स हैदराबादने आपली वेगवान गोलंदाजी भक्कम करण्यावर भर दिला आहे. या ट्रेडमधील एकमेव भारतीय चेहरा असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद आता पुन्हा एकदा हैदराबादच्या जर्सीत दिसणार आहे. 2018 ते 2021 दरम्यान SRH कडून खेळलेल्या खलीलची ही एकप्रकारे ‘घरवापसी’च ठरली आहे. चेन्नईकडून 2025 मध्ये 15 विकेट्स घेणाऱ्या खलीलला 4.8 कोटींच्या किमतीत हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतले आहे. त्याच्यासोबतच डेथ ओव्हर्सचा तज्ज्ञ मानला जाणारा ऑस्ट्रेलियाचा नॅथन एलिस 2 कोटींच्या किमतीत SRH मध्ये दाखल झाला आहे.

रणनीतीत मोठा बदल

या मेगा ट्रेडमुळे चेन्नईने आपल्या ऑलराउंडर खेळाडूंची फळी मजबूत केली आहे, तर हैदराबादने आपल्या पेस अटॅकला नवी धार दिली आहे. आगामी लिलावाआधी झालेल्या या मोठ्या उलथापालथीमुळे दोन्ही फ्रँचायझींच्या रणनीतीत मैदानावर काय नवे ट्विस्ट येतात, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us