
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी दहाही संघांनी आपल्या संघात बदल करण्यास सुरूवात केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात व्यवस्थापनात काही बदल केले जात आहे. तसेच मिनी लिलावापूर्वी नोव्हेंबरमध्ये रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे ट्रेड विंडोसाठी आता काही दिवस शिल्लक राहीले आहेत. त्यामुळे फ्रेंचायझींनी आवडत्या खेळाडूसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. यात सर्वात मोठं नाव हे संजू सॅमसनचं होतं. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाऐवजी दुसऱ्या संघातून खेळण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र आता या चर्चांना काही अंशी बळ मिळताना दिसत आहे. कारण संजू सॅमसनसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने मोठी डील केल्याचं बोललं जात आहे. संजू सॅमसन पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसू शकतो. एका रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचडून प्लेयर स्वॅपबाबत चर्चा रंगली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात संजू सॅमसन बाबतची चर्चा आता पुढे सरकत आहे. मागचं पर्व संपल्यानंतरच संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आर अश्विनने घेतलेल्या मुलाखतीतही संजू सॅमसनने याबाबतचे संकेत दिले होते. पण तेव्हा चर्चा ही चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीची होती. पण या शर्यतीत आता दिल्ली कॅपिटल्स पुढे असल्याचं दिसून येत आहे. जर ही ट्रेड झाली तर 9 वर्षानंतर संजू सॅमनस दिल्लीतून खेळताना दिसेल. यापूर्वी 2016 आणि 2017 मध्ये संजू सॅमसन दिल्लीकडून खेळला होता.
राजस्थान रॉयल्स संघावर दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती. त्या दरम्यान संजू सॅमसन दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स संघात पदार्पण केलं. 2018 पासून राजस्थान रॉयल्स संघासोबत खेळत आहे. पण आता दिल्ली कॅपिटल्सने संजू सॅमसनसाठी संघातील एक आक्रमक खेळाडू पटावर ठेवला आहे. रिपोर्टनुसार, दिल्लीने मधल्या फळीतील आक्रमक खेळी करणारा दक्षिण अफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सला त्याच्या बदल्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. पण स्टब्ससोबत राजस्थानने एका अनकॅप्ड खेळाडूची मागणीही केली होती. पण दिल्लीने ही मागणी धुडकावून लावली आहे. आता येत्या दिवसात खरं काय ते चित्र स्पष्ट होईल.