IND A vs SA A: पंतची टीम इंडियात निवड निश्चित! पहिल्या डावात फेल, दुसऱ्या डावात केली अशी कामगिरी
भारत ए विरुद्ध दक्षिण अफ्रिका ए यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. हा कसोटी सामना ऋषभ पंतसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील कामगिरीवर त्याचं टीम इंडियातील पदार्पण ठरणार आहे. असं असताना दुसऱ्या डावात त्याने चमकदार कामगिरी केली.

भारत ए आणि दक्षिण अफ्रिका ए संघात चार दिवसीय कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताला विजयासाठी अजून 156 धावांची गरज आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. दक्षिण अफ्रिका ए संघाने विजयासाठी दिलेल्या 275 धावा दिल्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना भारत ए संघाने 4 गडी गमवून 119 धावा केल्या आहेत. या सामन्यातील पहिल्या डावात ऋषभ पंत काही खास करू शकला नव्हता. पण दुसऱ्या डावात ऋषभ पंतने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या डावात ऋषभ पंत 81 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 64 धावांवर खेळत आहे. चौथ्या दिवशी त्याच्याकडून विजयी खेळीची अपेक्षा आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने ही कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची खेळी निवड समितीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. 14 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत त्याची निवड होण्याची शक्यता आहे.
दक्षिण अफ्रिका ए संघाने पहिल्या डावात 309 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारत ए संघ 234 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे त्यांना पहिल्या डावात 75 धावांची आघाडी मिळाली होती. या डावात कर्णधार ऋषभ पंत काही खास करू शकला नव्हता. 20 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा करून बाद झाला होता. दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 199 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला आणि भारत ए संघासमोर विजयासाठी 275 धावांचं आव्हान ठेवलं.
पहिल्या डावात भारत ए संघाकडून चार बळी घेणाऱ्या तनुश कोटियनने दुसऱ्या डावातही जबरदस्त कामगिरी केली. दुसऱ्या डावात 8 षटकं टाकली त्यात 26 धावा देत 4 गडी बाद केले. गुरनूर ब्रारने दोन्ही डावात दोन बळी घेतले. पहिल्या डावात एक बळी घेणाऱ्या अंशुल कंबोजने दुसऱ्या डावात तीन फलंदाजांना बाद केले. दुसऱ्या डावात भारताचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. साई सुदर्शन 12, आयुष म्हात्रे 6, देवदत्त पडिक्कल 5 आणि रजत पाटीदार 28 धावा करून बाद झाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋषभ पंत नाबाद 64 आणि आयुष बदोनी नाबाद 0 धावांवर खेळत आहे.
