“टी20 वर्ल्डकप बघू इच्छित नाही, जेव्हा निवड होईल..”, रियान परागचं दु:ख आलं बाहेर

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. साखळी फेरीत 20 संघ आपलं नशिब आजमावणार आहेत. त्यापैकी पुढे 8 संघांनाच संधी मिळणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडसोबत आहे. असं असताना रियान पराग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या एका वक्तव्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

टी20 वर्ल्डकप बघू इच्छित नाही, जेव्हा निवड होईल.., रियान परागचं दु:ख आलं बाहेर
| Updated on: Jun 03, 2024 | 2:52 PM

टी20 वर्ल्डकपचं नववं पर्व सुरु झालं आहे. पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 20 संघांमध्ये जेतेपदासाठी लढत होत आहे. या 20 संघापैकी आठ संघ सुपर 8 फेरीत दाखल होतील. यासाठी साखळी फेरीत चुरशीची लढाई होताना दिसत आहे. आपल्या गटात टॉप 2 मध्ये राहण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्न करत आहे. असं सर्व वर्ल्डकपमय वातावरण असताना रियान परागच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर रियान पराग सध्या आराम करत आहे. आयपीएलचं पर्व त्याच्यासाठी चांगलं गेलं. मात्र असं असूनही टी20 वर्ल्डकपसाठी संघात निवड झाली नाही. त्यामुळे त्याचं दु:ख त्याला कुठेतरी सळत असणार हे आता समोर आलं आहे. रियान परागला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टॉप 4 संघ कोणते असतील? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने कसलाही विचार न करता बिनधास्तपणे उत्तर दिलं. पण त्याच्या या उत्तराने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. रियान परागने सांगितलं की, “टी20 वर्ल्डकप पाहण्यात मला रूची नाही. जेव्हा मी स्वत: वर्ल्डकप खेळेन, तेव्हा टॉपच्या चार संघांचा विचार करेन.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत रियान पराने टॉप 4 मध्ये टीम इंडिया असेल हे सांगितलं होतं. पण आता टॉप संघांबाबत सांगण्यास स्पष्ट नकार दिला आहे. द भारत आर्मीसोबत झालेल्या चर्चेत रियान परागने सांगितलं की, “हे एक पक्षपाती उत्तर असले. पण खरं सांगायचं तर मी हा वर्ल्डकप पाहू इच्छित नाही. मला फक्त इतकंच पाहायचा आहे की कोण जिंकतंय आणि मला आनंद होईल. जेव्हा मी वर्ल्डकप खेळेन तेव्हा टॉप 4 संघांना विचार करेन.”

रियान परागने नुकताच दावा केला होता की, एक दिवस टीम इंडियासाठी खेळेन, मग काहीही होवो. रियान परागने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “कोणत्यातरी एका वळणावर तुम्हाला मला घ्यावं लागेल, हो ना? तर मला विश्वास आहे की मी भारतासाठी नक्कीच खेळेन. पण सध्या मला त्याची चिंता नाही.”

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली हे खेळाडू नसतील, याचा अंदाज क्रीडाप्रेमींना आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी 22 वर्षीय रियान परागची निवड होण्याची शक्यता आहे. रियान परागने देशांतर्ग आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. राजस्थान रॉयल्ससाठी त्याने 150 च्या स्ट्राईक रेटने 573 धावा केल्या आहेत. मागच्या पर्वात त्याची बॅट चालली नव्हती त्यामुळे त्याच्यावर टीका होत होती.