ENG vs IND : इंग्लंडच्या पहिल्या दिवशी 251 रन्स, टीम इंडियाला 4 विकेट्स, जो रुट शतकापासून 1 धाव दूर

England vs India 3rd Test Day 1 Stumps and Highlights : टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या दिवशी 4 झटके दिले. तर इंग्लंडने 251 धावा केल्या. आता दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज इंग्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ENG vs IND : इंग्लंडच्या पहिल्या दिवशी 251 रन्स, टीम इंडियाला 4 विकेट्स, जो रुट शतकापासून 1 धाव दूर
Ben Stokes and Joe Root
Image Credit source: Icc X account
| Updated on: Jul 11, 2025 | 12:14 AM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. यजमान इंग्लंडने दिवसभराच्या खेळात 250 पार मजल मारली आहे. तर टीम इंडियाला 4 विकेट्स घेण्यात यश आलं आहे. इंग्लंडने 83 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 251 धावा केल्या. इंग्लंडकडून माजी कर्णधार जो रुट आणि कर्णधार बेन स्टोक्स ही जोडी नाबाद परतली. तर टीम इंडियासाठी नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

जो रुट 99 धावांवर परतला. त्यामुळे रुटला आता शतकासाठी दुसऱ्या दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. रुटने 191 बॉलमध्ये 9 फोरसह नॉट आऊट 99 रन्स केल्या. तर बेन स्टोक्स याने 102 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 39 धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 79 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली आहे. त्यामुळे दुसर्‍या दिवशी या जोडीला लवकरात लवकर फोडण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे.

चौघांची कामगिरी कशी

जो रुट आणि बेन स्टोक्स या दोघांव्यतिरिक्त इंग्लंडच्या बाद झालेल्या फलंदाजांना आश्वासक सुरुवात मिळाली होती. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या या फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने 43 धावांची भागीदारी केली. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी याने कमाल केली. नितीशने त्याच्या लॉर्ड्सवरील पहिल्यावहिल्या षटकात 2 विकेट्स घेतल्या. नितीशने बेन डकेट आणि झॅक क्रॉली या दोघांना आऊट केलं.

डकेटने 23 तर क्रॉलीने 18 धावा केल्या. त्यानतंर ओली पोप आणि जो रुट या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी 109 धावा जोडल्या. रवींद्र जडेजा याने ही जोडी फोडली. जडेजाने ओली पोप याला विकेटकीपर ध्रुव जुरेल याच्या हाती कॅच आऊट केलं. पोपने 104 बॉलमध्ये 4 फोरसह 44 रन्स केल्या. त्यानंतर जसप्रीत बुमराह याने हॅरी ब्रूकला स्वस्तात गुंडाळलं. बुमराहने हॅरीला 11 धावांवर बोल्ड केलं. त्यामुळे इंग्लंडचा स्कोअर 4 आऊट 172 असा झाला.

पहिल्या दिवसाचा गेम ओव्हर

त्यानतंर जो रुट याची साथ देण्यासाठी बेन स्टोक्स मैदानात आला. या जोडीने चिवट खेळी करत दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट गमावली नाही. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी इंग्लंडला शक्य तितक्या कमी धावांवर रोखावं, अशी आशा चाहत्यांना आहे.