ENG vs IND : 5 विकेट्सनंतर खणखणीत शंभर, बेन स्टोक्सची ऐतिहासिक कामगिरी

Ben Stokes England vs India 4th Test : मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने शतक ठोकलं. त्याआधी स्टोक्सने 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

ENG vs IND : 5 विकेट्सनंतर खणखणीत शंभर, बेन स्टोक्सची ऐतिहासिक कामगिरी
Ben Stokes England Captain
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 26, 2025 | 11:49 PM

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने टीम इंडिया विरुद्ध मँचेस्टरमधील चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. स्टोक्सने यासह टीम इंडियाला 358 धावांवर ऑलआऊट करण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर बेन स्टोक्स याने शतक ठोकत इंग्लंडला 600 पार पोहचवलं. स्टोक्स या सामन्यात इंग्लंडसाठी शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. स्टोक्सआधी जो रुट याने शतक केलं. इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 669 धावा केल्या. इंग्लंडने यासह 311 धावांची आघाडी घेतली.

जो रुट याने 150 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर स्टोक्सने इंग्लंडचा स्कोअरकार्ड धावता ठेवला. स्टोक्सने या दरम्यान 164 चेंडूत 9 चौकारांसह शतक पूर्ण केलं. स्टोक्सने यासह 2 वर्षांनंतर कसोटीत शतक झळकावलं. स्टोक्सच्या कसोटी कारकीर्दीतील हे 14 वं शतकं ठरलं. स्टोक्सने शतकानंतर गिअर बदलला आणि फटकेबाजी करत इंग्लंडला 300 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. स्टोक्स पाहता पाहता 150 धावांच्या जवळ येऊन पोहचला होता. मात्र तेव्हा रवींद्र जडेजाने साई सुदर्शनच्या हाती कॅच आऊट करत स्टोक्सच्या खेळीला ब्रेक लावला. स्टोक्सने 198 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 11 फोरसह 141 रन्स केल्या.

स्टोक्सची ऐतिहासिक कामगिरी

स्टोक्स एका सामन्यात 5 विकेट्स आणि शतक करणारा इंग्लंडचा चौथा खेळाडू ठरला. तसेच स्टोक्सने यासह मोठा कारनामा करत 42 वर्षांची प्रतिक्षा संपवली. याआधी 1983 साली पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खान याने टीम इंडिया विरुद्धच अशी कामगिरी केली होती.

इंग्लंडचा पहिलाच कर्णधार

स्टोक्सने यासह इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतिहास घडवला. बेन स्टोक्स इंग्लंडसाठी एकाच सामन्यात शतक आणि 5 विकेट्स घेणारा पहिला कर्णधार ठरला. स्टोक्सआधी कोणत्याही इंग्लंडच्या कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नव्हता. तसेच स्टोक्सने या खेळीदरम्यान 7 हजार कसोटी धावा पूर्ण केल्या. स्टोक्स यासह कसोटीत 7 हजार धावा आणि 200 विकेट्स घेणारा तिसरा खेळाडू ठरला.

स्टोक्सचा पंजा

दरम्यान त्याआधी स्टोक्सने 24 ओव्हरमध्ये 72 धावा देत टीम इंडियाच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. स्टोक्सने साई सुदर्शन, कॅप्टन शुबमन गिल, शार्दूल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर आणि अंशुल कंबोज या खेळाडूंना आऊट केलं.