
शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा माज उतरवला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 311 धावांची आघाडी मोडीत काढून इंग्लंडला विजय मिळवण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. भारताने कर्णधार शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात पाचव्या दिवसापर्यंत 4 विकेट्स गमावून 425 धावा केल्या. त्यानंतर सामना अनिर्णित असल्याचं जाहीर करण्यात आलं. या सामन्यानंतरही इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जुलैपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंडने पहिल्या डावात टीम इंडियाच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरात 669 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडसाठी जो रुट आणि कर्णधार बेन स्टोक्स या जोडीने शतकी खेळी केली. रुटने 150 तर स्टोक्सने 141 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 311 धावांची आघाडी मिळवता आली. प्रत्युत्तरात चौथ्या दिवशी इंग्लंडच्या ख्रिस वोक्स याने भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. वोक्सने यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या दोघांना भोपळाही फोडून दिला नाही. त्यामुळे इंग्लंड डावानेच सामना जिंकणार, असं दिसत होतं.
यशस्वी-साई आऊट झाल्याने टीम इंडियाची 0-2 अशी स्थितीत झाली. तिथून केएल आणि शुबमन या जोडीने भारताला सावरलं आणि इंग्लंडला सामन्यात मागे खेचण्यात निर्णायक भूमिका बजावली. या दोघांनी चौथा दिवस खेळून काढला आणि नाबाद परतले. त्यानंतर पाचव्या दिवशी ही जोडी मैदानात आली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 188 रन्स जोडल्या. केएल राहुल 90 धावा करुन आऊट झाला.
केएलनंतर वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 34 धावा जोडल्या. शुबमनने या दरम्यान शतक ठोकलं. मात्र शुबमन शतकानंतर आऊट झाला. शुबमनने 103 धावा केल्या. भारताने 222 धावांवर चौथी विकेट गमावली. त्यानंतर सुंदरची साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजाला जो रुटने स्लिपमध्ये पहिल्याच बॉलवर कॅच सोडत जीवनदान दिलं. त्यानंतर जडेजा-सुंदर या जोडीने इंग्लंडला अक्षरक्ष: रडवलं.
जडेजा आणि सुंदर या जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद 203 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी इंग्लंडची आघाडी मोडीत काढली. त्यामुळे इंग्लंड इथून डावाने सामना जिंकणार नसल्याचं निश्चित झालं. आघडी मोडीत काढल्यानंतर या जोडीने दे दणादण फटकेबाजी केली. या जोडीने द्विशतकी भागीदारी करत सामना अनिर्णित राहणार असल्याचं निश्चित केलं. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने सांमजस्याने सामना वेळेआधी अनिर्णित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र भारताने हा प्रस्ताव फेटाळला. यानंतर रवींद्र जडेजा याने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील पाचवं कसोटी शतक ठोकलं. जडेजाच्या पाठोपाठ सुदंरने पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. भारताने यासह 143 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 425 रन्स केल्या. त्यानंतर ड्रेसिंग रुममधून कर्णधार शुबमनने थांबण्याचा इशारा दिला. अशाप्रकारे सामना अनिर्णित राहिला.
मँचेस्टरमधील सामना अनिर्णित
The 4th Test ends in a draw in Manchester! 🤝
Tremendous display of resistance and composure from #TeamIndia in Manchester! 👏👏
Onto the Final Test at the Oval 🏟️
Scorecard ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND pic.twitter.com/GCpaWQKVfb
— BCCI (@BCCI) July 27, 2025
रवींद्र जडेजा याने भारतासाठी नाबाद आणि सर्वाधिक धावा केल्या. जडेजाने 185 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 107 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने 206 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आऊट 101 रन्स केल्या.