IND vs ENG : हेडिंग्लेमध्ये टीम इंडियाची ‘कसोटी’, आतापर्यंत किती सामने जिंकलेत?

India vs England 1st Test : टीम इंडियाची हेडिंग्ले लीड्समध्ये गेल्या 23 वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये विजयाची पाटी कोरीच आहे. त्यामुळे शुबमन गिल त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची ही 2 दशकांपेक्षा अधिकची प्रतिक्षा संपवणार का?

IND vs ENG : हेडिंग्लेमध्ये टीम इंडियाची कसोटी, आतापर्यंत किती सामने जिंकलेत?
Shubman Gill Team India Test Captain
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 16, 2025 | 2:02 PM

टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 20 जूनपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत कसोटी मालिकेसाठी जोरदार सराव केला आहे. तर उर्वरित काही दिवसांमध्ये टीम इंडियाचे खेळाडू जोरदार सराव करताना दिसणार आहेत. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या मालिकेची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. भारताच्या तुलनेत इंग्लंडसाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे इंग्लंडला विजयाची संधी अधिक आहे. मात्र मैदानात कोण कसा खेळतो? यावरुन विजयी संघ निश्चित होईल.

उभयसंघातील सलामीचा सामना हा हेडिंग्ले लीड्समध्ये होणार आहे.टीम इंडियासाठी या मैदानात विजय मिळवणं फार आव्हानात्मक असणार आहे. कारण टीम इंडियाला फार सामने जिंकता आलेले नाहीत. या कसोटी मालिकेच्या निमित्ताने भारताची हेडिंग्ले लीड्समध्ये आतापर्यंत टेस्टमध्ये कशी कामगिरी राहिली आहे, हे आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

टीम इंडियाने 1952 साली हेडिंग्ले लीड्समध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. भारताला तेव्हा 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर 1959 साली इंग्लंडने टीम इंडियावर 1 डाव आणि 173 धावांनी मात केली होती.
इंग्लंडने या विजयानंतर 1967 साली भारतावर 6 विकेट्सने मात केली होती. इंग्लंडने अशाप्रकारे टीम इंडिया विरुद्ध हेडिंग्लमध्ये विजयी हॅटट्रिक पूर्ण केली होती.

त्यानंतर टीम इंडियाला 1979 साली इंग्लंड विरुद्ध सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरली होती. टीम इंडियाने यासह पराभवाची मालिका खंडीत करण्यात यश मिळवलं.

पहिला विजय 1986 साली

टीम इंडियाला 34 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हेडिंग्ले लीड्समध्ये पहिला विजय मिळवण्यात यश आलं. टीम इंडियाने कपिल देव यांच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. टीम इंडियाने इंग्लंडचा 279 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यानंतर 2002 साली इंग्लंडवर धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाने तेव्हा डाव आणि 46 धावांनी सामना जिंकला. कपिल देव यांच्यानंतर सौरव गांगुलीने भारताला या मैदानात दुसरा विजय मिळवून दिला.

2002 नंतर टीम इंडियाने तब्बल 19 वर्षांनी इथे सामना खेळला. टीम इंडियाला तेव्हा विराट कोहली याच्या नेतृत्वात पराभूत व्हावं लागलं. विराट कोहली याला इंग्लंड विरुद्ध 2021 साली टीम इंडियाला विजयी करुन कपिल देव आणि सौरव गांगुली यांच्या यादीत स्थान मिळवण्याची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही.

टीम इंडियाला विराटच्या नेतृत्वात 2021 साली डाव आणि 76 धावांनी पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया 4 वर्षांनी पुन्हा एकदा याच मैदानात खेळण्यासाठी सज्ज आहे. आता कर्णधार शुबमन गिल  पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयी सुरुवात करुन देत इतिहास घडवणार का? हे पाहणं औतुस्क्याचं ठरणार आहे.