Shubman Gill : तो कॅप्टन्सीसाठी आता.., कुलदीप यादवने शुबमन गिलबाबत मनात होतं ते सांगून टाकलं
Kuldeep Yadav on Shubman Gill : रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर आता शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार सुरु असताना टीम इंडियाचे आजी माजी कसोटी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी तडकाफडकी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. रोहित आणि विराट या दोघांनी इंग्लंड दौऱ्याआधी घेतलेला हा निर्णय भारतीय चाहत्यांसह आजी माजी क्रिकेटपटूंसाठी धक्कादायक आणि आश्चर्यकारक असा होता. रोहितच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याची भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. शुबमन गिल 2000 नंतरचा टीम इंडियाचा सर्वात युवा कर्णधार ठरला. शुबमनसमोर पहिल्याच मालिकेत सर्वात मोठं आव्हान असणार आहे. युवा खेळाडूंसह आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळवून देण्याचं आव्हान शुबमनसमोर असणार आहे.
इंडिया ए टीमने इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 अनऑफिशियल टेस्टमध्ये कडवी झुंज देत मालिका 0-0 ने बरोबरीत सोडवली. तर आता टीम इंडियाचे खेळाडू आपआपसात इन्ट्रा स्क्वॉड मॅच खेळत आहे. इंडिया विरुद्ध इंडिया ए यांच्यात इन्ट्रा स्क्वॉड मॅच 13 जूनपासून खेळवण्यात येत आहे.या 4 दिवसीय सराव सामन्यातील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा चायनामॅन बॉलर कुलदीप यादव याने शुबमन गिलच्या नेतृत्वाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
कुलदीप यादव काय म्हणाला?
“शुबमनला नेतृत्व कसं करायचं हे माहित आहे. शुबमनने गेल्या काही वर्षांत संघातील अनुभवी खेळाडूंसह काम केलंय. शुबमनला गेल्या एका वर्षात कसोटीसह एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्मासह अनेक चर्चांमध्ये सहभाग घेताना पाहिलं असेल. शुबमनने यातून बरंच काही शिकलं असेल,याची मला खात्री आहे. मी आतापर्यंत शुबमनला नेतृत्व म्हणून पाहिलंय, त्यामुळे शुबमन फार प्रेरित आहे. शुबमन टीमला पुढे नेण्यात निर्णायक भूमिका बजावत आहे. शुबमनमध्ये गेल्या 3 ते 4 सत्रांमध्ये तीच ऊर्जा आणि नेतृत्वाची चुणूक पाहायला मिळत आहे, जे आधीच्या कर्णधाराने दाखवलं होतं. शुबमन आमच्या टीमच्या कॅप्टन्सीसाठी पूर्णपणे तयार आहे”, असं कुलदीपने पत्रकार परिषदेत म्हटलं.
कॅप्टन शुबमन गिलकडे इतिहास घडवण्याची संधी
दरम्यान शुबमन गिलसाठी ही मालिका आव्हानात्मक आहे. या मालिकेत शुबमनच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. मात्र शुबमनला या मालिकेत इतिहास घडवण्याचीही संधी आहे. शुबमनने तसं केल्यास त्याचं नाव भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल, यात काडीमात्र शंका नाही.
इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतून शुबमन पर्वाला सुरुवात होत आहे. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये अखेरीस 2007 साली कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हापासून टीम इंडियाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. राहुल द्रविड यांनी 2007 साली टीम इंडियाला अखेरीस इंग्लंडमध्ये मालिका जिंकून दिली होती. तेव्हापासून टीम इंडियाची 18 वर्षांची प्रतिक्षा कायम आहे. आता शुबमनकडे ही प्रतिक्षा संपवण्याची संधी आहे.
