ENGW vs IREW : इंग्लंडकडून आयर्लंडचा दारूण पराभव, वनडे सामन्यात संपूर्ण संघ 45 धावात तंबूत

इंग्लंड आणि आयर्लंड महिला संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने दणदणीत विजय मिळवला. आयर्लंडला 275 धावांनी पराभूत केलं. तसेच मालिका 2-0 ने खिशात घातली.

ENGW vs IREW : इंग्लंडकडून आयर्लंडचा दारूण पराभव, वनडे सामन्यात संपूर्ण संघ 45 धावात तंबूत
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 09, 2024 | 9:53 PM

इंग्लंड आणि आयर्लंड महिला संघ दुसऱ्या वनडे सामन्यासाठी आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 320 धावा केल्या. तसेच विजयासाठी 321 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडची फलंदाजी ढासळली. तसेच संपूर्ण 16.5 षटकात तंबूत परतला आणि फक्त 45 धावा करता आल्या. इंग्लंडने आयर्लंडवर 275 धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडकडून टॅमी बीउमाँटने नाबाद 150 धावांची खेळी केली. 139 चेंडूचा सामना करून 16 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 150 धावा केल्या. तिने 107.91 च्या स्ट्राईक रेटने ही धावसंख्या केली. तिला मधल्या फळीतील फ्रेया केम्पची उत्तम साथ लाभली. दोघांनी मिळून चौथ्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. टॅमी बीउमाँटच्या दीड शतकी खेळीमुळे तिला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

इंग्लंडने दिलेल्या 321 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ पत्त्यासारखा कोसळला. सलामीला आलेली ऊना रेमंड होय हीने 22 धावा केल्या. व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. गॅबी लुईस 0, एमी हंटर 2, ओरला प्रेंडरगास्ट 0, लीह पॉल 1, रेबेका स्टोकेल 5, आर्लेन केली 0, ॲलिस टेक्टर 1, जेन मॅकग्वायर 2, फ्रेया सार्जेंट7 अशा विकेट पडल्या. इंग्लंडकडून केट क्रॉसने 3, इस्सी वोंगने 2, जॉर्जिया डेव्हिसने 2, लॉरेन फाइलरने 3 विकेट घेतल्या.  दरम्यान, पहिल्या वनडे सामन्यात आयर्लंडने 46.5 षटकात सर्वबाद 210 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं होतं. पण इंग्लंडच्या संघाने हे आव्हान 34.5 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं.आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना 11 सप्टेंबरला होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): एम्मा लॅम्ब, टॅमी ब्युमॉन्ट, हॉली आर्मिटेज, पेज स्कॉलफिल्ड, फ्रेया केम्प, बेस हीथ (विकेटकीपर), मॅडी विलियर्स, केट क्रॉस (कर्णधार), इस्सी वोंग, जॉर्जिया डेव्हिस, लॉरेन फाइलर.

आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): उना रेमंड-होई, गॅबी लुईस (कर्णधार), एमी हंटर (विकेटकीपर), ओरला प्रेंडरगास्ट, लीह पॉल, रेबेका स्टोकेल, आर्लेन केली, ॲलिस टेक्टर, जेन मॅग्वायर, फ्रेया सार्जेंट, एमी मॅकग्वायर.